निर्बंध शिथिल केल्याबद्दल व्यावसायिकांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
लातूर (प्रतिनिधी) : गेल्या अनेक दिवसांपासून दुकाने उघडण्यासंदर्भात असणारे निर्बंध शिथिल करत रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिल्याबद्दल व्यावसायिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.
गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून सरकारने कोरोना विषयक निर्बंध लागू केलेले आहेत.त्यात दुकानांसाठीही ठराविक कालावधी देण्यात आलेला होता.त्याव्यतिरिक्त दुकाने उघडण्यास परवानगी नव्हती. यामुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले.व्यावसायिकांवर कर्जाचा बोजा वाढला. अनेकजण बेरोजगार झाले.
यासंदर्भात काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवण्यात आले होते.ग्रामीण भागातील अर्थचक्राला गती देण्यासाठी दुकानांच्या वेळा वाढवून द्याव्यात,अशी मागणी त्यात करण्यात आली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने या निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही लवकरच करण्याचे आश्वासन दिले होते.त्यानंतर अवघ्या काही दिवसात निर्बंध शिथिल करण्यात आले.यामुळे ग्रामीण व शहरी भागातही रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी मिळाली आहे.आता ग्रामीण भागातील व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत असून अर्थचक्र सुरळीत होत आहे.
शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीची दखल घेऊन सरकारने निर्बंध शिथिल केल्याबद्दल व्यावसायिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.