डॉक्टर्ससाठी वैद्यकीय क्षेत्रातील आद्ययावत शिक्षण व संशोधन याचे निरंतर अध्ययन अत्यंत महत्वपूर्ण-आयुष संचालक डॉ.रामन घुंगराळेकर

0
डॉक्टर्ससाठी वैद्यकीय क्षेत्रातील आद्ययावत शिक्षण व संशोधन याचे निरंतर अध्ययन अत्यंत महत्वपूर्ण-आयुष संचालक डॉ.रामन घुंगराळेकर

उदगीर(एल पी उगिले):- येथील धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर येथे आयोजित शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये नूतन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी ट्रान्झिशनल करिक्युलम प्रशिक्षण तथा आंतरवासियता प्रशिक्षणार्थी च्या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी बोलताना डॉ.रामन घुंगराळेकर(आयुष संचालक,महाराष्ट्र राज्य व प्रशासक,महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन,मुंबई)यांनी उपरोक्त उद्गार काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.दत्तात्रय वि.पाटील हे होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून आरती रामन घुंगराळेकर,शासकीय आयुर्वेद कॉलेज,नांदेड येथील डॉ.जातवेद पवार,डॉ.विजय उखळकर,डॉ.राजेंद्र अमिलकंठवार, डॉ.निसार अली खान,डॉ.दत्तात्रय चव्हाण हे सपत्नीक तर डॉ.सतिश मणियार,डॉ.येवले,डॉ.यशवंत दहिफळे, डॉ.दत्तात्रय एस.पाटील,डॉ.संजय तेलंग हे व्यक्तिशः उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान धन्वंतरी प्रतिमा पूजन-स्तवन व दीपप्रज्वलनाने झाली.वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागांतर्गत आयुष चिकित्सा पद्धतीसाठी अविरतपणे करीत असलेल्या उल्लेखनीय व अनुकरणीय योगदानाबद्दल डॉ.रामन घुंगराळेकर यांचा सुविद्य पत्नी आरती घुंगराळेकर यांच्यासह शाल,श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना डॉ.रामन घुंगराळेकर म्हणाले की, राष्ट्रीय आरोग्य नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात शासकीय आरोग्य यंत्रणेला विविध चिकित्सा पद्धतीच्या खाजगी क्षेत्रातील वैदयकीय संस्था व व्यावसायिकांचे महत्वपूर्ण योगदान आहे.आधुनिक चिकित्सा पद्धतीमधील नवनवीन संशोधनात्मक व प्रात्यक्षिकपर दृष्टीने प्राप्त कौशल्यपूर्ण ज्ञानाचा रुग्णांचे अनेक जीवनशैली जन्य आजार बरे करणे व आरोग्य रक्षण करणे यासाठी उपयोग करताना आयुर्वेदोक्त नियमित-संतुलित आहार-विहार व योग-प्राणायाम याचे सुद्धा रुग्णांना समुपदेशन करणे आवश्यक आहे.वैद्यकीय शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच न्यूनगंड,नैराश्य व तानतणावावर कायम जिद्द,आशावाद व चिकाटीने मात करून संशोधन व सूक्ष्म निरीक्षण वृत्ती जोपासणे क्रमप्राप्त आहे. तरच ते एक कुशल व निपुण डॉक्टर म्हणून नावलौकिक मिळवू शकतील.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील जर्नल्स मध्ये शोध प्रबंध सादर करणे तथा भविष्यात समाजाच्या सर्व घटकांना अत्यल्प दरात फॅमिली डॉक्टर या उदात्त व भावनिक संकल्पनेनुसार सामाजिक उत्तरदायित्वाच्या जाणीवेतून आरोग्य सेवा पुरविण्या साठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.सद्यस्थितीत केंद्रशासन व राज्य सरकार हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आयुष चिकित्सा पद्धती च्या केवळ भारतातच नसून अन्य विविध देशामध्ये प्रचार-प्रसारासाठी मोठ्या प्रमाणावर विविध उपक्रम राबवीत आहे.त्यामुळे राजमान्यता व समाज मान्यता मिळण्यासाठी या अभियाना मध्ये आयुष डॉक्टर्स व विद्यार्थी यांनी नियमितपणे योगदान दिल्यास सामाजिक स्वास्थ्य निर्मितीसाठी आयुष चिकित्सा पद्धतीचे महत्त्व प्रकर्षाने दिसून येईल.आयुर्वेद शास्त्राध्ये नमूद सिद्धांताचे आधुनिक मापदंड-निकषावर तुलनात्मक अध्ययन, विवेचन व विश्लेषण करून जागतिक आरोग्य संघटनाकडे सुद्धा सदरील माहिती आयुष मंत्रालय, भारत सरकार च्या माध्यमातून सादर होत असते.त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची संस्कृती असलेल्या आयुर्वेद शास्त्राची एक अत्यंत महत्वपूर्ण वैद्यकीय विज्ञान म्हणून ओळख निर्माण होऊन आयुर्वेद पदवीधारकाला विदेशात सुद्धा संशोधक,फार्मा इंडस्ट्रीसह अन्य ठिकाणी नौकरी किंवा खाजगी चिकित्सक म्हणून जाण्याची संधी मिळत आहे.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.दत्तात्रय वि.पाटील यांनी वैद्यकीय व्यावसायिक व समाज यांच्यामध्ये सुसंवाद असणे गरजेचे असून, त्यासाठी मोफत रोगनिदान शिबिरे व आरोग्य प्रबोधन-समुपदेशन कार्यक्रमांची मोलाची भूमिका आहे, असे अधोरेखित करून धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज,उदगीर हे विद्यार्थ्यांना विविध चिकित्सा पद्धतीचे सखोल आद्ययावत व संशोधनात्मक ज्ञान निरंतरपणे देणे तथा आर्थिक दृष्ट्या दुर्बल व निर्धन घटकातील रुग्णांना मोफत उपचार व अत्यल्प दरात दर्जेदार आरोग्य सेवा देणे, यासाठी सदैव कार्यरत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ.अस्मिता भद्रे व डॉ.शिवकुमार मरतुळे लिखित बाल पंचकर्म या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ.विजय उखळकर, डॉ.जातवेद पवार यांची समायोचित मार्गदर्शनपर भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक-अहवाल वाचन डॉ.सायाराम श्रीगिरे व पाहुण्यांचा परिचय डॉ.प्रशांत बिरादार यांनी तथा सूत्रसंचालन डॉ.अस्मिता भद्रे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.मीरा कदम यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.अमोल पटणे,डॉ.योगेश सुरनर,डॉ.शिवकुमार मरतूळे, डॉ.विष्णुकांत जाधव,डॉ.मल्लिकार्जुन बिरादार,डॉ.नामदेव बनसोडे,डॉ.प्रवीण बलुतकर,डॉ.अमोल पाटील,डॉ. शिवकुमार बिरादार,डॉ.स्वप्निल बिरादार-पाटील आदींचे सहकार्य लाभले.याप्रसंगी डॉ.अलका भंडारे, डॉ.पुष्पा गवळे,डॉ.रविकांत पाटील, डॉ.बालाजी कट्टेवार,डॉ.उषा काळे, डॉ.रश्मी चिद्रे,डॉ.प्राजक्ता जगताप, डॉ.स्नेहल पाटील,डॉ.दीपिका भद्रे, डॉ.शीतल घोरबांड,डॉ.नम्रता कोरे, डॉ.मधुमिता सोप्पा,डॉ.श्रुती तिवारी, डॉ.प्रीती पतंगे,डॉ.शिवानी पाटील,डॉ. माधुरी बिरादार,डॉ.जयश्री भरकडे, आदी डॉक्टर्स तथा प्रथम ते चतुर्थ वर्ष बी.ए.एम.एस.चे विद्यार्थी-विद्यार्थिनी व आंतरवासियता प्रशिक्षणार्थी आणि तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी,रुग्णालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!