31 जानेवारी पुर्वी रेशनधारकांच्या मोबाईल आधार क्रमांकाचे सिडींग पुर्ण करावे
लातूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार सिडींग 100 टक्के पुर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सुचना आहेत. लातूर जिल्हयातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेच्या सुमारे 20.68 लक्ष लाभार्थ्यांपैकी 86.63 टक्के लाभार्थ्यांचे आधार सिडींग झाले आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी जिल्हयात मोहिम राबवून लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल सिडींग करणे आवश्यक आहे.त्यासाठी स्वस्त धान्य दुकानांतील ई-पॉस उपकरणांमधील EKYC व्दारे आधारसिडींग व मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करुन आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे प्रमाण वाढविण्यात येत आहे.
दिनांक 31 जानेवारी पुर्वी प्रत्येक रेशनकार्डमध्ये लाभार्थ्यांचे नाव 100 टक्के आधार सिडींग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक सिड करण्याच्या उद्दीष्टाने जिल्हयात मोहिम राबविण्यात येत आहे. माहे जानेवारीचे धान्याचे वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाव्दारे स्वस्त धान्य दुकानदार यांच्या मार्फत कुटुंबातील सदस्याचा आधार सिड नसल्यास अशा सदस्याचा आधार व मोबाईल क्रमांकाचे लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या स्वस्त धान्य दुकानाच्या ठिकाणी जावून सिडींग पुर्ण करुन घ्यावे.
EKYC पडताळणी व मोबाईल सिडींग सुविधा वारण्याची कार्यप्रणाली स्वस्त धान्य दुकानदारांना कळविण्यात आलेली आहे. आवश्यक तेथे ही सुविधा वापरण्याबाबतचे प्रशिक्षण दुकानदारांना देण्यात येत आहे. दि.31 जानेवारीपर्यंत आधार सिडींग न झालेल्या लाभार्थ्यांचे अनुज्ञेय धान्य पुढील महिन्यापासून आधार सिडींग होईपर्यंत निलंबित होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सदर बाब म्हणुन लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहु नये, यासाठी 31 जानेवारीपूर्वी आधार आणि मोबाईल क्रमांक सिडींग 100 टक्के पुर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी केले आहे.
ज्या शिधापत्रिकांवर मागील सलग 3 महिन्यांत धान्य उचलण्यात आले नाही, अशा सर्व शिधापत्रिका तात्पुरती निलंबित करण्यात येईल किंवा धान्य अनुदान नसलेल्या योजनेत वर्ग करण्यात येणार आहे. धान्य उचलण्यात न आलेल्या सर्व शिधापत्रिका जानेवारीनंतर कायमस्वरुपी निलंबित करण्यात येईल. त्यामुळे आधार व मोबाईल क्रमांक सिडींग पुर्ण करण्याची कार्यवाही लाभार्थ्यांनी तात्काळपुर्ण करण्याचे व 100 टक्के लाभार्थ्यांना पादरदर्शीपणे अन्नधान्य मिळण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.