एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.
17 जानेवारी रोजी जिल्ह्याच्या ग्रामीण, शहरी व मनपा कार्यक्षेत्रात ही मोहीम राबविली जाणार
लातूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण मोहिम 17 जानेवारी 2021 रोजी लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण, शहरी व महानगरपालिका क्षेत्रात राबविली जाणार आहे. त्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यातील एकही बालक पल्स पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी व ही मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी परस्परात योग्य समन्वय ठेवून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत जिल्हा टास्क फोर्स च्या बैठकीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज मार्गदर्शन करीत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर लक्ष्मण देशमुख, डॉक्टर बालाजी बरुरे, जिल्हा अतिरिक्त आरोग्य अधिकारी यु व्ही साळुंके, दयानंद मोटेगावकर, आय ए पी चे अध्यक्ष डॉक्टर गोपाळ जाजू यांच्यासह आरोग्य यंत्रणेतील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेचे नियोजन करताना एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याकरिता जिल्हास्तरावर तयार करण्यात आलेल्या सूक्ष्म कृती आराखड्याचा विचार करण्यात येऊन स्थलांतरित, भटकी लोकसंख्या व जोखीम ग्रस्त कार्यक्षेत्राचे योग्य नियोजन करून या भागातील सर्व बालकांना लसीकरण करण्यात येईल याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी दिले.
राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण मोहिम रविवार दिनांक 17 जानेवारी 2019 रोजी जिल्ह्याच्या ग्रामीण शहरी व मनपा कार्यक्षेत्रात राबविण्यात येत आहे. ही मोहीम झाल्यानंतर एक दिवसाचा खंड देऊन लगेच आय पी पी आय ग्रामीण भागात तीन दिवस व शहरी भागात पाच दिवस राबविण्यात येणार आहे. नियोजनानुसार कर्मचाऱ्या मार्फत घरोघरी भेटी देऊन पोलिओ मोहिमेच्या दिवशी वंचित राहिलेल्या बालकांना पोलिओ लसीचा डोस देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर परगे यांनी दिली.
लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एक लाख 97 हजार 352 शहरी भागातील 34 हजार 868 लातूर महापालिका क्षेत्रातील 45000 असे एकूण 2 लाख 77 हजार 220 झिरो ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना या मोहिमेअंतर्गत पोलिओ लस देण्याचे नियोजन करण्यात आलेले असून याकरिता एकूण 2116 पोलिओ बूथ तयार करण्यात आले असून 5 हजार 621 मनुष्यबळाची उपलब्धता केली असून या सर्व बुथवर नियंत्रण ठेवण्यासाठी 411 सुपरवायझरची नेमणूक करण्यात आलेली आहे असे माहिती डॉक्टर बालाजी बरुरे यांनी दिली. तसेच जिल्ह्यात 143 ट्रांशीत टीम तयार करण्यात आल्या असून ते रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड व चेक पोस्टवर थांबून त्याठिकाणी येणाऱ्या बालकांचे लसीकरण करणार आहेत. तर जिल्ह्यात एकूण 111 मोबाईल टीम तयार करण्यात आले असून त्याद्वारे ही ही लसीकरण करण्याचे नियोजन केलेले आहे अशी माहिती डॉ बरुरे यांनी दिली. या मोहिमेच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन केलेले असून संबंधित अधिकारी कर्मचा-यांना प्रशिक्षण देऊन संपूर्ण जिल्ह्यात वितरण करणे व ती योग्य ठिकाणी योग्य तापमानात ठेवणे याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत असे त्यांनी सांगितले.