तोंडार गावाला विमा ग्राम पुरस्कार जाहीर, 75 हजाराचा विकास निधी सुपूर्द
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील मौजे तोंडार येथील विमा प्रतिनिधी माधव पटवारी यांनी कृष्ट काम करून विमा ग्राम पुरस्कार पटकावला आहे. गावच्या विकासासाठी भारतीय जीवन विमा निगम यांच्या वतीने 75 हजार रुपयांचा विकास निधी गावच्या सरपंच शैलजा माधव पटवारी यांना सुपूर्द करण्यात आला आहे. भारतीय जीवन विमा निगम उदगीर शाखेचे शाखाधिकारी मकरंद जोशी, विकास अधिकारी शिवराज कडगे, विमा प्रतिनिधी माधव पटवारी यांच्या उपस्थितीत हा विकास निधी सरपंचाकडे सुपूर्द करण्यात आला. उदगीर तालुक्यातील एक विकासाच्या टप्यावर असलेले गाव म्हणुन तोंडाकडे पाहिले जाते. अनेक विकास योजना तोंडार गावासाठी सरपंच यांनी मंजूर करून आणल्या आहेत, त्यांना जिल्हा परिषद सदस्य विजया बिरादार यांनी सहकार्य केले आहे.
तोंडार गाव मॉडेल व्हिलेज म्हणून विकासाच्या योजनेत घेतले गेले आहे. त्या अनुषंगाने गावच्या विकासासाठी शासनाकडून योग्य प्रमाणात निधीही उपलब्ध केला जाणार आहे. विमा प्रतिनिधी माधव पटवारी यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन भारतीय जीवन विमा निगम कंपनीने तोंडार गावासाठी दिलेला विकास निधी निश्चितपणे गावाच्या विकासासाठी उपयोगात येईल अशी माहिती सरपंच शैलजा पटवारी यांनी दिली.