नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत चंदन बसवराज पाटील नागराळकर विजयी
उदगीर (एल पी उगिले) उदगीर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 यामध्ये प्रभाग क्रमांक 16 ब मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार चंदन बसवराज पाटील नागराळकर हे नगर सेवक म्हणून अत्यंत चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या निवडणुकीत 271 मतांनी विजयी झाले आहेत.
नगर सेवक पदी विजयी झाल्यानंतर पत्रकारांना बोलताना चंदन पाटील नागराळकर म्हणाले, उदगीर नगरपरिषद निवडणुकीत माझ्यावर दाखवलेल्या अपार प्रेम, विश्वास आणि आशीर्वादाबद्दल प्रभाग क्रमांक 16 ब मधील सर्वच मतदार बंधु-भगिनींचे मनःपूर्वक आभार. आपल्या एकजुटीने, ठाम विश्वासाने आणि पाठिंब्याने मला मोठे यश मिळाले. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक चळवळीतील सहकारी या सर्वांचे मी आभार मानतो.
आजचा हा विजय माझा एकट्याचा नसून माझ्या विचारांवर आणि कार्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक मतदाराचा आहे. निवडणुकीच्या काळात आपण सर्वांनी दिलेले प्रेम, आशीर्वाद आणि पाठिंबा यामुळेच आज हे यश मिळाले आहे.
नगर परिषदेच्या माध्यमातून आपल्या शहराचा कायापालट करणे आणि जनसामान्यांचे प्रश्न सोडवणे हेच माझे मुख्य ध्येय असेल. प्रचारादरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी, मी आजपासूनच कामाला सुरुवात करत आहे. आपल्या प्रभागाचा विकास हे माझे प्रथम ध्येय असणार आहे. नागरी सुविधा पुरवण्यावर भर दिला जाईल असा विश्वासही याप्रसंगी त्यांनी बोलून दाखवला.
