अहमदपूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात; फॉर्च्युनरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
पोलीस फ्लॅश न्यूज अहमदपूर( गोविंद काळे)अहमदपूर-नांदेड महामार्गावरील क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या पाटीजवळ रविवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास एका भरधाव कारने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. लातूरकडून अहमदपूरच्या दिशेने येत असलेल्या काळ्या रंगाच्या फॉर्च्युनर कारने (क्र. MH 13 ES 5657) समोरील मोटारसायकलला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात विठ्ठल पंजाबराव नाईक (वय ३५ वर्षे, रा. सानपाडा, नवी मुंबई, मूळ रा. भिरडा, जि. हिंगोली) यांचा जागीच मृत्यू झाला, तर विष्णू व्ही. के. हे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल नाईक हे त्यांच्या मोटारसायकलवरून (क्र. MH 43 CD 4894) क्राइस्ट स्कूलच्या रोडवरून हायवेमार्गे अहमदपूर शहराकडे येत होते. याच दरम्यान समोरून येणाऱ्या फॉर्च्युनर कारच्या चालकाने आपले वाहन अत्यंत हयगयीने आणि निष्काळजीपणे चालवून विठ्ठल यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच बिट अंमलदार साळवे आणि पोलीस कर्मचारी जायभाये यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहकार्य केले. अपघातानंतर कार चालक आपले वाहन घटनास्थळावरच सोडून पसार झाला आहे.
या घटनेबाबत मयताचे वडील पंजाबराव नारायणराव नाईक (वय ७५ वर्षे, व्यवसाय वकील) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०६ (१), २८१, १२५ (A) (B) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार चालकाचा शोध सुरू आहे.
