लातूर शहरातील वाहतूक शिस्त, सुरक्षितता व जनजागृतीसाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचा सर्वांगीण व प्रभावी लढा.

0
लातूर शहरातील वाहतूक शिस्त, सुरक्षितता व जनजागृतीसाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचा सर्वांगीण व प्रभावी लढा.

लातूर (एल पी उगिले) लातूर शहरातील वाहतूक ही केवळ वाहनांची हालचाल नसून ती नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेली अत्यंत संवेदनशील, शिस्तप्रिय व नियोजनबद्ध व्यवस्था आहे. वाढती लोकसंख्या, वाहनांची झपाट्याने वाढणारी संख्या, मर्यादित रस्ते, अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालक तसेच अवैध प्रवासी वाहतूक या सर्व बाबी लक्षात घेता शहरातील वाहतूक नियंत्रण हे मोठे आव्हान बनले आहे. या पार्श्वभूमीवर लातूर शहर वाहतूक नियंत्रण शाखा, लातूर यांनी पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ०१/०१/२०२५ ते २५/१२/२०२५ या कालावधीत कठोर, सातत्यपूर्ण व परिणामकारक अशी व्यापक कारवाई राबविली आहे.
या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन, अवैध प्रवासी वाहतूक, ओव्हर स्पीड, कर्णकर्कश सायलेंसर, सिग्नल तोडणे, विनापरवाना वाहने, पेंडिंग दंड वसुली याविरुद्ध केलेल्या कारवाईमुळे वाहतूक शिस्त प्रस्थापित होण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे.
शहर वाहतूक नियंत्रण शाखेने जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत एकूण १,०४,६७९ केसेस दाखल करून १०,५७,८६,२०० रुपये इतकी दंडरक्कम आकारलेली आहे. ही कारवाई केवळ दंड आकारण्या पुरती मर्यादित न राहता नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी शिस्त, भीती व जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरलेली आहे.
यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक प्रकरणी १६६ केसेस,मोटार वाहन कायदा अंतर्गत ८०,२९६ केसेस,इंटरसेप्टर वाहनाद्वारे ओव्हर स्पीड करणाऱ्या वाहनांवर १७,३३६ केसेस करून दंड आकारण्यात आला आहे.

अवैध प्रवासी वाहतूक व ऑटो रिक्षांवरील कठोर कारवाई.
लातूर शहरात विनापरवाना ऑटो रिक्षा, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरणे, ठराविक थांब्याबाहेरून प्रवासी घेणे यासारख्या तक्रारी लक्षात घेता शहर वाहतूक नियंत्रण शाखेने विशेष मोहीम राबविली. ६६(१) / १९२ मोटार वाहन कायद्यान्वये १६६ केसेस
त्यापैकी ६४ ऑटो रिक्षांवर थेट कारवाई करून एकूण ₹ २,०८,७००/- दंड आकारण्यात आला आहे. यासोबतच ऑटो रिक्षांवरील इतर वाहतूक नियमभंगाबाबत एकूण ११,०२७ केसेस करून ₹ ६३,२४,८००/- दंड वसुल करण्यात आला आहे.

कर्णकर्कश आवाज, फटाका सायलेंसरविरुद्ध निर्णायक भूमिका.

शहरातील ध्वनीप्रदूषण, नागरिकांना होणारा मानसिक त्रास व अपघातांचा धोका लक्षात घेता फटाका सायलेंसर, मफलर सायलेंसर, इंदोरी फटाका सायलेंसर व कर्णकर्कश हॉर्न वापरणाऱ्या वाहनांवर विशेष मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत ३४८ बुलेट सायलेंसर, २१ कर्णकर्कश हॉर्न
पंचासमक्ष पंचनामा करून जप्त करण्यात आले असून संपूर्ण कारवाईचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले आहे. यामुळे तरुण वर्गात मोठ्या प्रमाणावर सुधारणा दिसून येत आहे.
वाहतूक शिस्त अधिक सक्षम करण्यासाठी खालील बाबींवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली फॅन्सी नंबर प्लेट, विनानंबर प्लेट ८,२४१ केसेस,ट्रिपल सीट ४,५२४ केसेस, ऑटो फ्रंट सीट १,६६७ केसेस, विनागणवेश ऑटो चालक ३,४४१ केसेस, काळी-पिवळी टॅक्सी १६ केसेस करण्यात आले असून यामुळे व्यावसायिक वाहनचालकांमध्ये शिस्त निर्माण होण्यास मदत झाली आहे.
तसेच पेंडिंग चलन व अनपेड दंड वसुली व न्यायालयीन कारवाई करण्यात आली असून महा लोकअदालतीची नोटीस देऊनही दंड न भरणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध कठोर भूमिका घेत २०२५ मध्ये १७५ खटले भारतीय पुरावा कायदा कलम ६५(ब) अन्वये न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत.

वाहतूक जनजागृती – “वाहतुकीचे देवदूत” (ट्राफिक ॲम्बेसिडर) उपक्रम.

वाहतूक शिस्त ही केवळ दंडाने नाही तर जनजागृतीने निर्माण होते या उद्देशाने वाहतुकीचे देवदूत ही संकल्पना राबविण्यात आली. गणेश उत्सव, रस्ता सुरक्षा अभियान, सार्वजनिक कार्यक्रम, शाळा, महाविद्यालये, क्लासेस परिसर व शहरातील चौका-चौकात पथनाट्य, फ्लेक्स, देखावे, प्रत्यक्ष मार्गदर्शन यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे.

वाहतूक व्यवस्थेतील अडचणी व उपाययोजना.

लातूर शहरातील वाढती वाहनसंख्या, अरुंद रस्ते, पार्किंगचा अभाव, अतिक्रमण व मोकाट जनावरे यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी वेळोवेळी अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येत असून,१८ ठिकाणी सिग्नल कार्यान्वित करण्यात आले आहे, तसेच नव्याने ६ सिग्नलचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.ई-चलन प्रणाली प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे

ट्रॅफिक वॉर्डन नियुक्तीसाठी लातूर महानगरपालिकेकडे प्रस्ताव.

लातूर शहरात दिवसेंदिवस वाढत असलेली वाहनांची संख्या, प्रमुख चौकांवरील वाढती वाहतूक कोंडी तसेच वाहतूक शाखेकडे उपलब्ध असलेले अपुरे मनुष्यबळ यामुळे वाहतूक नियमनाचे काम अधिक आव्हानात्मक होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुलभ व सुरळीत राखण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीकरिता ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करण्याबाबत लातूर महानगरपालिकेकडे वेळोवेळी प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत. जर वाहतूक नियमनासाठी पोलिसांना प्रशिक्षित ट्रॅफिक वॉर्डनची मदत उपलब्ध झाल्यास, प्रमुख चौकांवरील वाहतूक नियंत्रण, वाहनांची शिस्तबद्ध हालचाल, नागरिकांना मार्गदर्शन, अपघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडी कमी करण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. .
अशा विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
शहर वाहतूक नियंत्रण शाखा, लातूर ही केवळ दंडात्मक कारवाई करणारी यंत्रणा न राहता, वाहतूक शिस्त, सुरक्षितता, जनजागृती व नियोजनात्मक विकास यांचा समन्वय साधणारी सक्षम यंत्रणा म्हणून कार्यरत आहे. भविष्यातही नागरिकांच्या सहकार्याने लातूर शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध व सुलभ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जाणार आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!