माफसू निर्मित ‘महाराष्ट्राचे पशुवैभव’ व ‘माफसू यशोगाथा’ पुस्तकांचे उदगीर मध्ये भव्य प्रकाशन
उदगीर (एल पी उगिले) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (माफसू) यांच्या विस्तार संचालनालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्राचे पशुवैभव’ आणि ‘माफसू यशोगाथा’ या दोन महत्त्वपूर्ण पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच पशुवैद्यक महाविद्यालय, उदगीर येथे आयोजित ३४ व्या राष्ट्रीय परोपजीवी शास्त्र परिषदेच्या समारोप प्रसंगी संपन्न झाले.
या प्रसंगी डॉ. एन. रामास्वामी (सचिव, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विभाग, महाराष्ट्र राज्य),डॉ. नितिन पाटील (कुलगुरू, माफसू, नागपूर),डॉ. प्रविणकुमार देवरे (आयुक्त, पशुसंवर्धन), डॉ. सचिन बोंडे (संचालक, विस्तार शिक्षण, माफसू, नागपूर), डॉ. अनिल भिकाने ( माजी संचालक, विस्तार शिक्षण, माफसू), डॉ. ए. संगरन (चेन्नई), डॉ. अशोक देवंगरे (सहयोगी अधिष्ठाता) व डॉ. गोपाळ भारकड यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘महाराष्ट्राचे पशुवैभव’ या
पुस्तकांत महाराष्ट्रातील एकूण १८ नोंदणीकृत पशुधन प्रजातींची सविस्तर शास्त्रीय माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. यामध्ये ७ गोवंश, ४ म्हशी, ४ शेळ्या तसेच प्रत्येकी एक मेंढी, अश्व व वराह प्रजातींचा समावेश आहे. या प्रजातींची पैदास क्षेत्रे, शारीरिक गुणवैशिष्ट्ये, उत्पादन व प्रजनन गुणधर्म तसेच उपयुक्तता यांचा अभ्यासपूर्ण आढावा देण्यात आला आहे. तसेच सध्या नोंदणी प्रक्रियेत असलेल्या किंवा नोंदणी पूर्णत्वास गेलेल्या १४ अवर्णित पशुधन प्रजातींची थोडक्यात माहिती देण्यात आली असून, यामध्ये ७ गोवंश, २ म्हशी, १ शेळी, १ मेंढी, २ श्वान व २ गदर्भ प्रजातींचा समावेश आहे. या पुस्तिकेचे वैशिष्ट्य म्हणजे विविध पशु प्रजातींचे उत्कृष्ट रंगीत छायाचित्रे व विद्यापीठातील पशुअनुवंशशास्त्र विभागातील तज्ज्ञांनी लिहिलेला अभ्यासपूर्ण मजकूर.
‘माफसू यशोगाथा’ या पुस्तकात माफसूच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शन, प्रशिक्षण व प्रोत्साहनातून दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, वराह पालन, मत्स्य व्यवसाय व प्रक्रिया उद्योगात यशस्वी ठरलेल्या ५२ उद्योजकांच्या प्रेरणादायी यशोगाथा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या यशोगाथा ग्रामीण उद्योजकतेसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या आहेत.
या दोन्ही पुस्तकांचे मुख्य संपादक डॉ. अनिल भिकाने (माजी संचालक, विस्तार शिक्षण, माफसू) असून,
‘महाराष्ट्राचे पशुवैभव’ या पुस्तकाच्या संपादनात डॉ. शैलेंद्र कुरळकर, डॉ. प्रविण बनकर, डॉ. गितांजली ढुमे व डॉ. सारीपुत लांडगे यांनी योगदान दिले आहे.
तर ‘माफसू यशोगाथा २०२५’ या पुस्तकाच्या संपादनात डॉ. बापूराव कदम, डॉ. अतुल ढोक, डॉ. गितांजली ढुमे, डॉ. विजयसिंह लोणकर, डॉ. तेजस शेंडे, डॉ. स्वप्नील घाटगे, डॉ. हेमंत गावंडे व डॉ. सारीपुत लांडगे यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
या पुस्तकांची आकर्षक मुखपृष्ठ रचना, पृष्ठ सजावट व छपाई आयसीटी मीडिया, नागपूर यांनी केली आहे.
या दोन्ही पुस्तकांच्या डिजिटल प्रती माफसूच्या www.mafsu.ac.in या संकेतस्थळावर सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहेत.
