हजारोंच्या उपस्थितीत डॉ. दीपक सोमवंशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल
उदगीर (एल पी उगिले) उदगीर तालुक्यातील निडेबन जिल्हा परिषद मतदार संघातून उदगीर शहरातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ तथा समाजसेवक, महात्मा बसवेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. दीपक सोमवंशी यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते माजी मंत्री तथा विद्यमान आमदार संजय भाऊ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली समाजसेवेचा संकल्प घेऊन राजकारणाला साथ देण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मूळचे निडेबन येथील रहिवासी असलेले डॉ. दीपक सोमवंशी हे उदगीर शहरासह पंचक्रोशी मध्ये आणि सीमा भागातही एक लोकप्रिय आणि गरीबों का मसीहा अशा नावाने परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. डॉ. सोमवंशी हे राजकारणात उतरत आहेत, हे समजतात कित्येक जाणकार नागरिकांनी आणि मतदारांनी त्यांना पाठिंबा देत सक्रियपणे त्यांच्यासोबत राहण्याचा निर्धार करून उमेदवारी अर्ज दाखल करताना तहसील कार्यालयापर्यंत हजेरी लावली.
आदर्श आचारसंहितेचा विचार करून मर्यादित लोकांची रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करावा, असा संकल्प केलेला असताना देखील अनेक जण स्वयंस्फूर्तपणे त्यांच्यासोबत उपस्थित राहिले. मतदारसंघातील अनेक गावातील गावप्रमुख आणि गाव पुढार्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करतानाच त्यांना शुभेच्छा दिल्या, आणि उच्चविद्याविभूषित उमेदवार या मतदारसंघात मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. याप्रसंगी डॉ. दीपक सोमवंशी यांनी उपस्थिताना उद्देशून संबोधन करताना सांगितले की, मतदार संघातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांच्या आग्रहाखातर उदगीर विधानसभा मतदार संघाचा कायापालट करणारे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार संजय भाऊ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार करून निडेबन गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्याचा संकल्प केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघात आरोग्याच्या, शिक्षणाच्या तसेच सामाजिक विकास व युवक सक्षमीकरणाच्या क्षेत्रात काम करत असताना गती मिळाली पाहिजे. या भावनेने राजकारणाची साथ आपण धरली असून उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामे झाली आहेत. त्याच गतीने निडेबन जिल्हा परिषद मतदारसंघात देखील त्यांच्या नेतृत्वाखाली आपण कायापालट करू शकतो, असा विश्वास वाटल्याने आपण निवडणुकीत उतरत आहोत. विशेषतः गटातील पाणीपुरवठा असेल ग्रामीण भागातील रस्त्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल त्यासोबतच शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी त्यांचे प्रतिनिधित्व करता यावं असा संकल्प करून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगितले आहे. आपण सर्वसामान्य माणसाचा प्रतिनिधी म्हणून काम करणार असल्याचाही निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे.
