रात्री नवरा उशिरा घरी आल्याचा राग आला !!वैतागलेल्या माऊलीने पोटच्या पोरीचा खूनच केला !!
लातूर (एल. पी.उगीले) लातूर शहराच्या लगत असलेल्या हरंगुळ परिसरामध्ये एका विवाहित तरुणीने आपला पती रात्री उशिरा घरी येतो, याचा राग मनात धरून पुढच्या दीड वर्षाच्या मुलीच्या पोटात चाकू खुपसून, तिचा खून केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शहरात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी व हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे. कौटुंबिक वादातून एका निष्पाप बालिकेचा बळी जाणे ही अत्यंत गंभीर व वेदनादायक बाब असून अशा अमानुष कृत्याविरोधात लातूर पोलीस प्रशासनाने तात्काळ, प्रभावी व कायदेशीर कारवाई करत आपली जबाबदारी अत्यंत तत्परतेने पार पाडली आहे.
फिर्यादी विक्रम जगन्नाथ चौगुले, (वय ३४ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. हासेगाव सी, ता. कळंब, जि. धाराशिव, सध्या रा. श्यामनगर, मांजरा गेट समोर, ता. जि. लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांची पत्नी आश्विणी विक्रम चौगुले, (वय ३० वर्षे, रा. हासेगाव सी, ता. कळंब, जि. धाराशिव) हिच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशन, लातूर येथे फिर्यादीलावरून गुन्हा रजिस्टर नंबर 24/26, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची पार्श्वभूमी अशी की, आरोपी महिलेने दिनांक 18 जानेवारी रोजी आपल्या पतीस फोन करून “कामावरून घरी कधी येणार,?” अशी विचारणा केली होती. पती घरी न आल्याने रागाच्या व मानसिक अस्थैर्याच्या भरात पहाटे सुमारे 5 ते सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान श्यामनगर, मांजरा गेट समोर, लातूर येथील राहत्या घरी आपली अल्पवयीन मुलगी नंदिनी विक्रम चौगुले, वय दीड वर्षे हिच्यावर घरातील चाकूने अंगावर विविध ठिकाणी वार करून गंभीर जखमी केले. या गंभीर जखमांमुळे उपचारादरम्यान बालिका नंदिनी हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सदर घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळ पंचनामा केला. तसेच मृतदेहावर इनक्वेस्ट पंचनामा करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. आरोपी नामे आश्विणी विक्रम चौगुले हिला त्वरित ताब्यात घेऊन कायदेशीर अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे. संपूर्ण तपास शास्त्रीय पद्धतीने, पुराव्यांच्या आधारे व कायदेशीर चौकटीत पार पाडला जात आहे.
ही कारवाई अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लातूर, मंगेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक, लातूर तसेच समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे, पोलीस अमलदार जाधव, तुरे, कलमुकले यांनी अत्यंत तत्परतेने व जबाबदारीने ही संपूर्ण कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे हे करीत असून आरोपीविरुद्ध कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या अमानुष व मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनांबाबत लातूर पोलीस प्रशासन हे कठोर आणि कायदेशीर धोरण अवलंबित असून समाजातील प्रत्येक घटकाचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे.
नागरिकांनी कोणत्याही कौटुंबिक तणावाच्या प्रसंगी कायदा हातात न घेता समुपदेशन, सामाजिक व कायदेशीर मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहनही लातूर पोलीस प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
लातूर पोलीस प्रशासन समाजातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रत्येक निष्पाप नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव सज्ज असून अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये तत्काळ व प्रभावी कारवाई करून न्यायप्रक्रियेला गती देण्याचा लातूर पोलिसांचा निर्धार आहे.
