दृष्टिहीनांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणाऱ्या डॉ. रामप्रसाद लखोटिया यांचा गौरव

0
दृष्टिहीनांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणाऱ्या डॉ. रामप्रसाद लखोटिया यांचा गौरव

उदगीर (एल पी उगिले): येथील समाजसेवक तथा दृष्टिहीनांच्या शिक्षण, पुनर्वसन व अंधत्व निवारणाच्या कार्यात उल्लेखनीय योगदान देणारे उदगीर येथील ज्येष्ठ डॉक्टर उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्ररुग्णालय, उदगीरचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया व सौ.स्मिता रामप्रसाद लखोटीया यांना प्रतिष्ठेचा ‘लुई ब्रेल पुरस्कार २०२६’ प्रदान करून सपत्नीक सन्मानित करण्यात आले.
परतूर येथील लुई ब्रेल शिक्षण संस्था यांच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण व सत्कार सोहळा दि. २१ जानेवारी २०२६ रोजी परतूर येथील इंदिरा मंगल कार्यालय (लालबहादूर शास्त्री कॉलेज रोड) येथे उत्साहात पार पडला. याच कार्यक्रमात संस्थात्मक श्रेणीत पुणे येथील ‘माई बालभवन’ या संस्थेलाही गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. स्वागतजी थोरात (संपादक – रिलायन्स दृष्टी व स्पर्शज्ञान) होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व कवी श्री. इंद्रजीत भालेराव, लायन्स क्लब परतूरचे संस्थापक अध्यक्ष श्री. मनोहरजी खालापुरे, नगरसेवक व विवेकानंद सेवा केंद्राचे अध्यक्ष श्री. संदीपजी बाहेकर, जिल्हा समन्वयक श्री. राजेशजी ठाकूर तसेच सौ. स्वरूपा देशपांडे उपस्थित होते.
डॉ. लखोटिया यांनी उदगीर येथील ‘अरुणा अभय ओस्वाल रिसोर्स सेंटर फॉर द ब्लाइंड’ या केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपी, संगणक प्रशिक्षण, संगीत शिक्षण व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन मोफत उपलब्ध करून दिले आहे. सन २०१५ पासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे अनेक दृष्टिहीन विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून स्वावलंबी झाले आहेत.
तसेच उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्ररुग्णालय यांच्या माध्यमातून मोफत नेत्रतपासणी शिबिरे, अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व गरजू रुग्णांवरील उपचार सातत्याने राबविण्यात येत असून, लाखो रुग्णांना दृष्टी लाभली आहे.
सत्कारास उत्तर देताना डॉ. रामप्रसाद लखोटिया म्हणाले की, “हा पुरस्कार माझा वैयक्तिक नसून समाजासाठी व दृष्टिहीन बांधवांसाठी कार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. दृष्टिहीन व्यक्तींना शिक्षण, आत्मसन्मान व स्वावलंबन मिळावे, यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे यावे,” असे आवाहन त्यांनी केले.
या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे उदगीर शहरासह लातूर जिल्ह्याच्या सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात अभिमानाची भावना निर्माण झाली असून, डॉ. रामप्रसाद लखोटिया यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.
यावैळी श्रीकृष्ण पाटोळे,विश्वनाथ काळे,रवींद्र जोशी,प्रा.राजेंद्र चव्हाण,प्रा.राजकुमार मुक्कावार,गणेश मुंडे,गिरी सर,विवेकानंद शाळेतील विद्यार्थी व परतुर नगरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!