लाल बहादुर शास्त्री प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
उदगीर(एल.पी. उगीले) भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लाल बहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे,त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे तसेच विद्यार्थी,शिक्षक व पालक यांच्यात स्नेहपूर्ण नाते निर्माण करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वार्षिक स्नेहसंमेलनांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा स्थानिक समन्वय समिती कार्यवाह शंकरराव लासुणे तर,उद्घाटक म्हणून बालवाडी अध्यक्षा अंजलीताई नळगीरकर व संमेलन प्रमुख सुधाकर पोलावार व सहप्रमुख श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी उपस्थित होते. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते नटराजच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व श्रीफळ फोडून सम्मेलनाला सुरुवात झाली.
सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर गाणी, लोकगीते, सण व उत्सव विषयक गाणी,भक्तीगीते, एकपात्री नाटक अश्या विविध गाण्यांवर चिमुकल्यांनी उत्तम नृत्य आविष्कार सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.सांस्कृतिक कार्यक्रमात इयत्ता पहिली ते चौथीच्या एकूण ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रम पाहण्यासाठी पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.गीत यादी वाचन सौ. सुनेजा मठपती व सौ.भाग्यश्री स्वामी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
