जिल्ह्यात पाच ठिकाणी होणारी ड्राय रन यशस्वी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

जिल्ह्यात पाच ठिकाणी होणारी ड्राय रन यशस्वी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने दक्षता घ्यावी - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

कोविड-19 प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम

लातूर (प्रतिनिधी) : संपूर्ण राज्यात फ्रन्टलाइन वर्कर साठी पहिल्या टप्प्यात कोविड-19 प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम राबवली जात आहे. त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यात आज पावेतो 17 हजार 500 आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांची नोंदणी झालेली आहे. या लसीकरणासाठी पूर्वतयारी म्हणून लातूर जिल्ह्यातील पाच ठिकाणी दिनांक 8 जानेवारी 2021 रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजता या कालावधीत ड्राय रन घेतली जाणार असून ही ड्राय रन यशस्वी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित covid-19 प्रतिबंधासाठी लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हरिदास यांच्यासह आरोग्य विभागातील अन्य अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात ज्या ठिकाणी ड्राय रन होणार आहे त्याठिकाणी आरोग्य यंत्रणेने योग्य ती दक्षता घ्यावी व नियोजित वेळेत कोरोना प्रतिबंध साठी आयोजित लसिकरण ऑनलाइन द्वारे नोंदणी झालेल्या काही लोकांना ड्राय रन मध्ये समावेश करून घ्यावा व ही ड्राय रन यशस्वी करावी असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी सूचित केले. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आयोजित ड्राय रन ची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर परगे व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ हरिदास यांनी दिनांक 8 जानेवारी 2021 रोजी ड्राय रन च्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, उपजिल्हा रुग्णालय उदगीर, प्राथमिक आरोग्य केंद्र भातागळी, ग्रामीण रुग्णालय मुरुड व शहरी आरोग्य केंद्र मंठाळे नगर ही पाच ठिकाण निश्चित केली असून सकाळी आठ ते दुपारी दोन या कालावधीत ड्राय रन आयोजित केलेला आहे, अशी माहिती दिली. या पाच केंद्रावर नोंदणी केलेल्या आरोग्य सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांपैकी प्रत्येकी 25 लोकांना बोलावून घेऊन लसीकरणाच्या अनुषंगाने रंगीत तालीम केली जाणार आहे असे त्यांनी सांगितले.

आरोग्य क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, नर्सेस व इतर फ्रन्टलाइन आरोग्य कर्मचारी सुमारे 17 हजार 500 जणांची नोंदणी ऑनलाइन द्वारे झालेली आहे. या ड्राय रन द्वारे कोरोना प्रतिबंधासाठी राबविण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेची रंगीत तालीम होणार असून ऑनलाइन नोंदणीसाठी को-इन हे सॉफ्टवेअर वापरण्यात आले असून याद्वारे या सर्व कार्यप्रणाली ची माहिती घेतली जाणार असून प्रत्यक्ष लसीकरण मोहीम राबवताना कोणतीही अडचण येणार नाही याबाबत दक्षता घेतली जाणार असल्याची माहिती डॉक्टर हरिदास यांनी दिली.

About The Author