मराठी भाषेचे संवर्धन ही काळाची गरज – डॉ. सुशीलप्रकाश चिमोरे
उदगीर (एल पी उगिले) मराठी ही आपली मातृभाषा आहे. मराठी भाषेमध्ये अनेक बोली आहेत. इतर भाषेच्या प्रभावामुळे या बोली नष्ट होत आहेत. त्याचा परिणाम मराठी भाषेवर होत आहे. त्यामुळे मराठीचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. असे उद्गार श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ. सुशीलप्रकाश चिमोरे यांनी काढले. ते शिवाजी महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त व्याख्यान प्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामकिशन मांजरे होते. तर प्रमुख उपस्थिती मराठी विभागप्रमुख डॉ.सुरेश शिंदे यांची होती.
यावेळी कांबळे साक्षी यांनी स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. मराठी विभागाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांचा पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. शुद्धलेखन स्पर्धेत प्रथम टोकलवाड गणेश बळीराम व येलमटे हरिश राम द्वितीय स्वामी शिकशंकर सुधाकर तृतीय तेवर मिनाक्षी राजा उत्तेजनार्थ जोशी श्रद्धा भरत बिरादार प्रज्ञा पांडुरंग,सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम मुंडे विद्यासागर नवनाथ द्वितीय कुलकर्णी संचिता अनिरूध तृतीय राठोड ऋतुजा सोपान उत्तेजनार्थ सूर्यवंशी निलेश खंडेराव,निबंध लेखन स्पर्धेत प्रथम जाधव श्रद्धा बालाजी द्वितीय केंद्र साक्षी आण्णाराव तृतीय इंगळे गायत्री संजय यांनी यश संपादन केले.
पुढे बोलताना डॉ चिमोरे म्हणाले, रंगनाथ पठारे यांच्या समितीने अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी खूप अभ्यास केला. सरकारकडे अहवाल सादर केला. त्यानुसार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. इतर भाषेच्या प्रभावाखाली आपण मराठी भाषेची गोची करत आहोत मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी आपल्या सर्वांनी जबाबदारी घ्यावी असेही ते म्हणाले. अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य मांजरे म्हणाले, आपली मातृभाषा आपल्याला समृद्ध बनवत असते. आजपर्यंत जे मोठे साहित्यिक होऊन गेले त्यांची मातृभाषा मराठीच होती. त्यामुळे आपल्याला खूप काही करण्याची संधी आहे असे याप्रसंगी ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ.सुरेश शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.एन.एस. केंद्रे यांनी तर आभार डॉ नरसिंग कदम यांनी मानले. कार्यक्रमाला पदवी व पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाना पटनुरे, राजू बसवगंडा यांनी सहकार्य केले.
