जुन्या भांडणाचा काढला वाद !!मित्रांनीच केला जिवलग मित्र बाद!!

0
जुन्या भांडणाचा काढला वाद !!मित्रांनीच केला जिवलग मित्र बाद!!

लातूर (एल पी उगिले) जिवलग मित्रांनीच आपल्या मित्राचा खून केल्याची दुर्दैवी घटना लातूर शहरात घडली आहेत. या संदर्भात पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, लातूर शहरातील बौद्ध नगर येथे राहणारे आणि व्यवसायाने मजूर असले तरी समाजसेवा आणि राजकारणामध्ये सक्रिय असलेले युवा नेते प्रज्वल उर्फ गोट्या संजय मस्के (वय 21 वर्ष) हा आपल्या चुलत भावासोबत अर्थात आतिश बाबासाहेब मस्के यांच्यासोबत रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील लाईफ लाईन हॉस्पिटल समोर आपल्या मित्राला पाहून आल्यानंतर थांबला होता. त्यावेळेस त्याच्या ओळखीचे जुने मित्र असलेले गणेश सुरेश गायकवाड आणि भिवा सूर्यवंशी हे दोघे तिथे आले.
त्यातील गणेश गायकवाड यांनी मोठ्याने आवाज देत प्रज्वल मस्के याला बोलावून घेतले. प्रज्वल मस्के यांच्याकडे जातच त्यांच्या जुना वाद उफाळून आला. वादाचे रूपांतर नंतर शाब्दिक झटापटीत झाले आणि लगेच शिवीगाळ सुरू झाली.” तू मला लय दिवसापासून डोक्यात बसलास… आज तुझा कायमचा बंदोबस्त करतो” अशी धमकी देत गणेश गायकवाड यांनी आपल्या कमरेला असलेला धारदार चाकू काढून प्रज्वल मस्के यांच्यावर वार केला.
याच दरम्यान भीमा सूर्यवंशी यांनी आतिश मस्केला धक्का देत बाजूला ढकलले आणि त्यालाही जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करत धमकी दिली. तेव्हा अतिश मस्के घाबरून त्या ठिकाणाहून पळून गेला. आरोपींनी प्रज्वल मस्के यांच्यावर पोटात व छातीवर वार केल्याने तो घटनास्थळीच रक्ताच्या थारोळात कोसळला.
याच दरम्यान आ. अमित विलासराव देशमुख हे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने महापूर येथील प्रचार सभा आटोकून बाबळगाव कडे परत जात होते. त्यांना एका तरुणावर चाकूने हल्ला होत असल्याचे निदर्शनास आले, त्यांनी तात्काळ क्षणाचाही विलंब न करता गाडी थांबवली. आणि घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा त्या ठिकाणावरून इतर लोक पळून गेले. रक्ताच्या थारोळात पडलेल्या प्रज्वलला पाहून त्यांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता आणि इतर डॉक्टरांना बोलून तातडीने उपचार करण्याचा सूचना केल्या. त्यासोबतच पोलीस प्रशासनालाही आवश्यक त्या सूचना करून असे प्रकार होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
गोट्या उर्फ प्रज्वल मस्के या उपचाराचा दरम्यानच मृत्यू आल्याचे वैद्यकीय सूत्राने सांगितले. याप्रकरणी अतीश मस्के यांच्या फिर्यादीवरून लातूर येथील विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथे गणेश सुरेश गायकवाड यांनी भीमा सूर्यवंशी (दोघे रा. आनंद नगर लातूर) यांच्या विरोधामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनास्थळावरील प्रत्यक्ष दर्शी अमित मस्के यांनी सांगितले की, आम्ही रात्री बॅनर तयार करण्यासाठी आंबेडकर चौकात आलो होतो. तेव्हा तेथे आमच्याच परिसरातील विकास गायकवाड याला कोणीतरी मारहाण केल्यामुळे त्याला लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये नेल्याचे समजले, म्हणून तिथे थांबलो होतो. त्याचवेळी बाजूच्या पान टपरीच्या मागे दोन्ही आरोपी थांबले होते. त्यांनी प्रज्वलला बोलावून घेतले. तो एकटाच तिकडे गेला, आणि त्यांची बाचावाची झाली. जोरजोरात भांडणाचा आवाज येत असल्यामुळे आम्ही तिथे पोहोचलो, तर एकाच्या हातात कोयता आणि दुसऱ्याच्या हातात सुरा होता. आरोपींनी प्रज्वलच्या पोटात आणि छातीत सुरा खुपसला. प्रज्वल खाली पडल्याबरोबर “गोट्याची विकेट पडली…. पळ पळ आता”असे बोलले आणि आरोपी तेथून पळून गेले.
प्रज्वल अगोदर राजकारणात ही सक्रिय होता. कदाचित त्यातून मतभेद झाले असावेत,असे सांगितले.
या संदर्भामध्ये शहरातील आणि जिल्ह्यातील एकूण गुन्हेगारी क्षेत्रामध्ये होत असलेली वाढ विचारात घेऊन, काँग्रेसचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी निवेदन दिले असून सदरील निवेदन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. या प्रकरणाचा तात्काळ तपास केला जावा, तसेच जिल्ह्यातील एकूण गुन्हेगारी वर वचक ठेवावा. अवैध धंदेवाल्याच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी. अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!