लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम.एका महिन्यात २६५ गुन्हे दाखल; २५ लाख ९१ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
लातूर (एल पी उगिले)समाजातील शांतता, सुरक्षितता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच जिल्ह्यात लपूनछपून सुरू असलेल्या अवैध धंद्यांचा समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा पोलीस दलाकडून प्रभावी व कठोर कारवाई करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेला अवैध धंद्यांविरोधात ठोस आणि परिणामकारक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले असून या आदेशांच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा पोलीस दलाकडून दिनांक १ जानेवारी २०२६ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात एकाचवेळी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाया करण्यात आल्या. या विशेष मोहिमेदरम्यान अवैध देशी व विदेशी दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. लातूर पोलिसांनी २०० व्यक्तींविरुद्ध १९७ गुन्हे दाखल करून रु. १०,०३,९१०/- किमतीचा देशी-विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त केला आहे.त्याचप्रमाणे मटका व जुगारासारख्या अवैध जुगार धंद्यांविरोधातही कडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत १५८ व्यक्तींविरुद्ध ६८ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १५,८७,९८०/- रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. एकूणच या एका महिन्याच्या विशेष मोहिमेमध्ये लातूर जिल्हा पोलीस दलाने अवैध धंदे करणाऱ्या २७९ व्यक्तींविरुद्ध २६५ गुन्हे दाखल करून रु. २५,९१,८९०/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तसेच लातूर शहरात आदर्श कॉलनी परिसरात कारवाई करत एका महिलेमार्फत चालविण्यात येणारे कुंटणखाण्यावर छापेमारी करण्यात आली असून चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलांना पैशाचे अमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकंदरीत अवैध धंद्यावरील दाखल गुन्ह्यातील आरोपी पुन्हा अवैध धंद्यां मध्ये सहभागी होऊ नयेत, यासाठी त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. सदर प्रतिबंधक आदेशांचे उल्लंघन झाल्यास संबंधितां विरुद्ध पुन्हा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा लातूर पोलिसांकडून देण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी यावेळी स्पष्ट केले की, “लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही.नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व समाजातील सुव्यवस्था राखण्यासाठी अशा कारवाया यापुढेही सातत्याने व अधिक तीव्रतेने सुरू राहतील.” लातूर जिल्हा पोलीस दलाची ही कारवाई अवैध धंदे करणाऱ्यांसाठी कडक इशारा असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे या निमित्ताने स्पष्ट करण्यात आले आहे.
