लातूर जिल्ह्यातील तिरुका शिवारामध्ये बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश

0
लातूर जिल्ह्यातील तिरुका शिवारामध्ये बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश

उदगीर (एल पी उगीले) उदगीर पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जळकोट तालुक्यातील तिरुका शिवारात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरू होती. मात्र त्या चर्चेला काही काहीही अर्थ नाही, त्या निव्वळ अफवा आहेत, लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, किंवा अफवा पसरवू नये. अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जात होत्या. याच दरम्यान या परिसरातील एका शेतकऱ्याच्या आवडत्या कुत्र्याचा फडशा बिबट्याने पाडला होता. कर्म धर्म संयोगाने ही घटना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत होती. आपण लेकरागत सांभाळलेल्या आणि आपल्यावर खूप प्रेम करणाऱ्या आपल्या लाडक्या कुत्र्याला बिबट्याने मारले. याबद्दल शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रचंड चिड निर्माण झाली होती. काही झाले तरी त्या बिबट्याला पकडलेच पाहिजे. कारण त्याच्यापासून इतरांनाही धोका होऊ शकतो. इतर प्राणी किंवा लहान मुलं, महिला यांना बिबट्या त्रास देऊ शकतो. या जाणिवेतून त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून विनंती केली. तरीही सदरील फुटेज हे लातूर जिल्ह्यातील नसून कुठल्यातरी दुसऱ्या जिल्ह्यातील आहे, अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली होती. शेवटी सदरील शेतकऱ्याने त्या बिबट्याला पकडले गेले पाहिजे अशा भावनेने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून सदरील सीसीटीव्ही फुटेज चे ठिकाण आणि आजूबाजूच्या ओळखीच्या खाना खुणा सांगून आपल्या शेत शिवारातील जागा दाखवली. तेव्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना खात्री पटली आणि मग वन विभागाचे परिमंडल अधिकारी एम.डी. गुट्टे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या शेतकऱ्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून या परिसरामध्ये सापळा लावला. वन विभागाच्या सापळ्यामध्ये बिबट्या अडकला. बिबट्या पकडला गेला हे समजताच आजूबाजूच्या शेत शिवारातील आणि गावातील लोकही हे चित्र पाहण्यासाठी त्या ठिकाणी जमा झाले होते. बिबट्याला पकडलेला पिंजरा वाहनामध्ये ढेवल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वांना दूर जाण्याच्या सूचना दिल्या, आणि वन विभागाचे वाहन बिबट्यासह निघून गेले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला पकडल्याबद्दल जळकोट आणि उदगीर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी वन विभागाचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच बिबट्या जेरबंद झाल्यामुळे सुटकेचा श्वास सोडला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!