वजन काट्याने ‘सॉरी’ म्हटले… आणि विक्रमाची आरोग्यदायी वाटचाल सुरू झाली,सायकलपटू उद्योजकाचा प्रेरणादायी संवाद ठरला प्रभावी

0
वजन काट्याने ‘सॉरी’ म्हटले… आणि विक्रमाची आरोग्यदायी वाटचाल सुरू झाली,सायकलपटू उद्योजकाचा प्रेरणादायी संवाद ठरला प्रभावी


उदगीर (एल पी उगीले)
शिक्षणाने अभियंता आणि पेशाने उद्योजक असलेल्या विक्रम विश्वनाथ मुडपे यांच्या वाढलेल्या शारीरिक वजनामुळे एकदा वजन काट्याने वजन करण्यास नकार देत चक्क ‘सॉरी’ म्हटले. हाच क्षण त्यांच्या आयुष्यातील निर्णायक वळण ठरला. एक क्विंटलहून अधिक वजन झालेल्या विक्रम मुडपे यांनी सायकलिंग आणि पोहणे या दोन माध्यमांतून आरोग्याची कमान स्वतःच्या हाती घेतली. साठीकडे वाटचाल करणाऱ्या या उद्योजकाचा संघर्ष आणि जिद्द ऐकून उदगीरकरांनी त्यांना मनापासून सलाम केला.
उदगीर तालुक्यातील गुडसूर येथील रहिवासी असलेल्या विक्रम मुडपे यांनी वाढलेल्या वजनाचे आव्हान स्वीकारत शरीराला दिलेला नवा आकार आणि आरोग्यदायी जीवनशैलीची वाटचाल जिव्हाळा ग्रुपतर्फे आयोजित कार्यक्रमात उलगडून सांगितली. कर्तृत्वाला वयाची किंवा परिस्थितीची सीमा नसते, हे त्यांनी आपल्या जीवनातून सिद्ध करून दाखवले.
सध्या पुणे येथे उद्योजक म्हणून कार्यरत असलेल्या विक्रम मुडपे यांच्या अनुभवकथनाचे आयोजन जिव्हाळा ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देविदासराव नादरगे होते. व्यासपीठावर जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष दशरथ शिंदे व नवनाथ पाटील उपस्थित होते.
पुणे–गोवा ही तब्बल ६०० किमीची सायकल दौड सलग ४० तासांत पूर्ण करणाऱ्या या सायकलपटूचा जिव्हाळा ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष दशरथ शिंदे यांनी केले. निवृत्त शिक्षण विस्तार संचालक डॉ. अनिल भिकाने यांनी विक्रम मुडपे यांच्या अलौकिक कार्याची उपस्थितांना ओळख करून दिली.
तांत्रिक शिक्षणातील पदवी घेतल्यानंतर नोकरी न करता उद्योजक व्हायचे स्वप्न उराशी बाळगून विक्रम मुडपे यांनी वाटचाल सुरू केली. आपल्या व्यावसायिक जीवनातील चढ-उतारांचे अनुभव सांगताना “व्यवसाय माणसाला जगायला शिकवतो,” असे ते म्हणाले. अपयशाने खचायचे नाही आणि यशाने हुरळून जायचे नाही, हा बाणा जपत पुण्यात उद्योग क्षेत्रात पाय रोवून उभा राहिल्याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.
व्यवसायासोबतच सायकल, रायडिंग, मॅरेथॉन आणि पोहणे या तिन्ही क्षेत्रांत काम करताना आलेले अनुभव आणि त्यातून कमावलेली ‘शरीर-संपत्ती’ हीच जीवनातील खरी ठेव असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकरराव केद्रें यांनी केले तर आभारप्रदर्शन बाबुराव वाघमारे यांनी केले.
कार्यक्रमास मसापचे अध्यक्ष धनंजय गुडसुरकर, प्रा. किरण दंडिमे, सायकलपटू विवेक होळसंबरे, पत्रकार व्ही. एस. कुलकर्णी यांच्यासह जिव्हाळा ग्रुपचे विश्वनाथराव मुडपे, अशोकराव बिरादार, विश्वनाथराव बिरादार, सोपानराव माने, रामराव मोमले, वैजनाथराव पंचगल्ले, शरणप्पा खेळगे,शंकरराव साबणे , पांडुरंग बोडके ,दिलीप कंधारे, मोहनराव खिंडीवाले, हावगीराव आचारे, चंद्रकांत पांचाळ, चंद्रकांत उप्परबावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!