नाशिक ! ऑक्सिजन गळती रोखण्यासाठी समितीच्या शिफारशी
नाशिक ( दत्तू वाघ ) : डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयातील ऑक्सिजन दुर्घटनेच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेंच्या अध्यक्षतेखालील समितीने या दुर्घटनेला दोन ठेकेदार कंपन्यांना जबाबदार धरले होते. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी राज्यातील सरकारी रुग्णालयांसाठी तीन शिफारशी केल्या आहेत. त्यात प्रत्येक सरकारी रुग्णालयात ऑक्सिजनचा पर्यायी बॅकअप असावा, रुग्णालयात तांत्रिक स्थिती हाताळण्यासाठी स्टाफला ट्रेनिंग देणे आणि प्रत्येक रुग्णालयात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशिक्षित प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. राज्य सरकारने या शिफारशींची अमंलबजावणी करण्याचे निर्देश दिल्यानंतर आयुक्तांनी वैद्यकीय विभागाला त्याच्या अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.
डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात २१ एप्रिल रोजी झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे जवळपास २४ जणांचा बळी गेला होता. त्यामुळे या घटनेची गंभीर दखल घेत सरकारने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची चौकशी समिती नियुक्त केली होती. अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी समितीने राज्य सरकारला शिफारशी केल्या आहेत. ऑक्सिजन गळतीसारख्या दुर्घटना झाल्यास ऑक्सिजन प्लांटच्या ठिकाणी पर्यायी ऑक्सिजनचा बॅकअप ठेवण्यात यावा, त्याचबरोबर सरकारी रुग्णालयातील स्टाफला आणीबाणीच्या प्रसंगात तांत्रिक बाबी हाताळता येतील, यासाठी तांत्रिक प्रशिक्षण देण्यात यावे, प्रत्येक रुग्णालयात एका प्रशिक्षित जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करून त्याच्यावर तांत्रिक गोष्टींची जबाबदारी देण्यात यावी अशा शिफारशीही समितीने केल्या आहेत. राज्य सरकारने नाशिक महापालिकेला अहवाल पाठवतानाच अहवालातील शिफारशी अन्य सरकारी रुग्णालयांमध्ये लागू करता येतील, याबाबतची सूचना राज्याच्या आरोग्य विभागाला केली आहे.