काँग्रेसच्या नाशिक शहराध्यक्ष पदासाठी लागली चुरस
नाशिक ( आकाश शेटे ) : काँग्रेसचा शहराध्यक्ष लवकरच बदलला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच नाशिकमध्ये जाहीर केले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, शहराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेत स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकविण्याची धमक असलेल्या नेतृत्वाचा शोध सुरू झाला आहे.
काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष शरद आहेर यांची फेब्रुवारीत प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागली. त्याआधी तब्बल सात वर्षे आहेर शहराध्यक्षपदाचा कारभार पाहत असले तरी आता नवीन नेतृत्वाला संधी दिली जावी, अशी मागणी पक्षातील कार्यकर्त्यांकडूनही जोर धरू लागली आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच नाशिकमध्ये आलेल्या पटोले यांनी शहराध्यक्षांसह अन्य काही पदांवर नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे जाहीर केले आहे. आगामी महापालिका निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक काँग्रेस स्वबळावरच लढणार, असे पटोले यांनी यापूर्वीच जाहीर केले असून नाशिक दौऱ्यातही त्याचा पुनरुच्चार करण्यात आला. परंतु, अद्याप शहरात काँग्रेसला लोकांचे फारसे पाठबळ मिळत नसल्याचे वास्तव आहे. महापालिकेचा गड स्वबळावर काबीज करण्यासाठी संघटनात्मक बांधणी मजबूत ठेवावी लागणार आहे. सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांना टक्कर द्यायची असेल तर तेवढेच तोलामोलाचे उमेदवार देण्याचे आव्हानही काँग्रेस पक्षासमोर आहे. त्यामुळे अनुभवी आणि खमक्या नेतृत्वाचा शोध पक्षाकडून घेण्यास सुरुवात झाली आहे.
सध्या ही नावे चर्चेत आहेत !
शहराध्यक्षपदी संधी मिळावी यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सरचिटणीस भरत टाकेकर, नगरसेवक राहुल दिवे, राज्य प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी शहराध्यक्ष शैलेश कुटे याशिवाय यापूर्वी जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेले राजाराम पानगव्हाणे यांचे नावही शहराध्यक्षपदासाठी चर्चेत आले आहे. शहराचा अभ्यास असणाऱ्या आणि जातिपातीचे संतुलन साधण्यासह ज्येष्ठांना बरोबर घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच शहराध्यक्ष म्हणून नियुक्त करावे लागणार आहे.