राजा म्हणजे विश्वस्त ही संकल्पना शिवरायांनी अमलात आणली – धनंजय गुडसुरकर
उदगीर (एल पी उगिले)
‘राजा म्हणजे विश्वस्त असतो ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी अंमलात आणली, रयतेसाठी राज्य ही भावना शिवरायांची थोरवी सांगणारी आहे. ‘असे मत प्रसिद्ध साहित्यिक, वक्ते व उदगीर मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष धनंजय गुडसूरकर यांनी केले. ते शिळवणी ता. देगलूर येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित ‘शिवराय समजून घेताना ‘या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कृषिअधिकारी प्रतापराव देशमुख होते, महाराष्ट्रातील प्रसिद्ध समीक्षक ऋषिकेश गंगाधरराव देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. छत्रपती शिवाजी महाराज हे सद्गुणांचा समुच्चय होते. त्यांच्यातला जिद्दी युद्धनीतीज्ञ, विधायक राजनीतिज्ञ, मुत्सद्यी,समाज नितीज्ञ व धुरंदर राजनितिज्ञ ही सारी रूपे पाहिली तर त्यांच्यातील थोरवी लक्षात येते. शिवरायांचा इतिहास पाहिला तर त्यांच्यातला नि:पक्षपाती पणा व इतरांमधले गुण शोधून त्यांना त्याप्रमाणे जबाबदाऱ्या देण्याची त्यांची भूमिका यातून निष्ठावान सहकाऱ्यांची फौज तयार झाली. उद्यमशीलता हे राजांची महत्त्वाचे वैशिष्ट्य राहिले, त्यातून त्यांच्या सहकाऱ्यांना सातत्याने प्रेरणा मिळत गेली. पराक्रमाचा आदर्श वर्तनातून घालून देणारे शिवाजी महाराज त्यामुळे कायमच आदर्श आहेत. आजच्या परिस्थितीत महाराजांची ही उद्यमशीलता प्रेरक असून त्यांच्या एका गुणाचा जरी अनुनय आम्हाला आज करता आला तर आपल्या पुढील अनेक प्रश्न सुटू शकतात, असे मत गुडसूरकर यांनी पुढे बोलताना व्यक्त केले. जात, पंथ, वंश यांचा विचार न करता उत्तम माणसे लोकसेवेसाठी निवडली जातात तेव्हा लोक कल्याण साधले जाते, आधुनिक लोकशाहीमध्ये हे तत्व मान्य केले जाते. शिवरायांनी चारशे वर्षांपूर्वी या तत्त्वाची अंमलबजावणी केली होती, यावरून त्यांच्या दूरदृष्टीपणाची कल्पना येते असे गुडसूरकर पुढे बोलताना म्हणाले. मला काय मिळणार? ही भावना आज प्रभावीपणे समोर येत असताना मी काय देऊ शकतो? अशी भावना असणारे मावळे शिवरायांनी निर्माण केले. स्वराज्याची खरी संपत्ती म्हणजे हे निष्ठावान मावळे होते. याच संपत्तीवर शिवरायांनी परकीय सत्तेचा पाडाव केला व रयतेला सुखाचे दिवस दाखवले असे सांगून शिवरायांच्या कार्याचा व व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेतला.
शिळवणी येथे यावर्षी प्रथमच सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंती महोत्सवानिमित्त ग्राम स्वच्छता अभियान, मृदंग वादन स्पर्धा, मोफत आरोग्य तपासणी, कीर्तन, शिवपूजन शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व महाप्रसादाचे आयोजन शिवशंभु प्रतिष्ठान व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते. ह. भ. प. ज्ञानेश्वरी ताई सुरनर यांचे शिवचरित्रावर कीर्तन झाले. शिवजन्मोत्सवाच्या सोहळ्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णा देशमुख, उपाध्यक्ष विलास माने, सचिव ज्ञानेश्वर माने आणि शिळवणीच्या समस्त गावकरी मंडळीनी पुढाकार घेतला. ऋषिकेश देशमुख यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले .
