सौ. सुरेखा सर्जेराव भांगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
उदगीर (एल पी उगिले) उदगीर विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी विद्यमान आ. मंत्री संजय भाऊ बनसोडे यांची उदगीर विधानसभा मतदारसंघावरची पकड दिवसेंदिवस अधिकाधिक मजबूत होत चालली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये हे सिद्धही झाले आहे. उदगीर तालुक्यातून पंचायत समितीच्या दोन जागा अपक्षांनी जिंकल्या होत्या. मात्र त्या त्या परिस्थितीमध्ये आपल्याला संधी दिलेली नाही, म्हणून नाराज झालेले कार्यकर्ते स्वतंत्र अस्तित्व दाखवून विजयश्री खेचून आणून आपला हक्क सिद्ध करून दाखवला आहे. त्यानंतर मात्र आपण आपल्या नेत्यांच्या सोबतच राहावे, असे ठरवून त्या कार्यकर्त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश करून लोकनेते आ. संजय भाऊ बनसोडे यांचे नेतृत्व मान्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून आपण विकास करूया, अशी भावना त्यांनी ठेवली आहे.
उदगीर पंचायत समितीच्या वाढवणा गणातून अपक्ष म्हणून विजयी झालेल्या सौ. सुरेखा सर्जेराव भांगे पाटील यांनी उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार विकास पुरुष संजय भाऊ बनसोडे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे पंचायत समिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या संख्याबळात वाढ होऊन वाढवणा बु गणातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली आहे.
यावेळी पक्षाच्या ध्येय धोरणांवर विश्वास व्यक्त करुन सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देवुन वाढवणा गणाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वामुळे स्थानिक पातळीवर विकासकामांना गती मिळेल आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या जाहीर पक्षप्रवेशाच्या प्रसंगी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार संजय भाऊ बनसोडे यांच्यासोबत निडेबन जिल्हा परिषदेचे सदस्य डॉक्टर दीपक सोमवंशी, हेर जिल्हा परिषद गटाचे सदस्य प्रा. मटके, तोगरी जिल्हा परिषद गटाचे सदस्य ज्ञानेश्वर बिरादार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समितीचे सदस्य सुनिता राठोड, प्रकाश राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. शाम ढवळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सरपंच वसंतराव पाटील, उदगीर, देवणी, जळकोट जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेचे सचिव सर्जेराव भांगे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अविनाश गायकवाड, धनाजी मुळे, सिद्धार्थ सूर्यवंशी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
