केटीपी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे कवीसंमेलन संपन्न
जळकोट (एल पी उगीले) येथील कर्मयोगी तुळशीराम पवार महाविद्यालय,हडोळती येथील मराठी विभागाच्या वतीने नुकतेच नवोदित कवी साठी खास करून विद्यार्थी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी तथा मराठी विभागप्रमुख डॉ.बालाजी भंडारे हे उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयातील तथा परिसरातील अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले.त्यात विशेषतः रसिकांचे लक्ष वेधून घेतले ते नवोदित कवी रामेश्वर सोरगेकर, कवी अरुण वाघमारे,कवी रामेश्वर माने यांच्या -हदयस्पर्शी कवितानी. कवी रामेश्वर सोरगेकर याने ‘पुन्हा पुन्हा तुला आठवावे’ अशी प्रेमावरची भावविव्हळ करणारी कविता सादर केली. त्याचबरोबर ‘बाप’ या कवितेतून बापाचे कष्टकरी जीवन उभे केले. कवी अरुण वाघमारे यांनी ‘देवा तू सुद्धा घेतोस सत्व’ आणि ‘हीच वाट जशी कधी न चुकणारी’ अशी अनुक्रमे मायबाप आणि बहिणीशी आपुलकीचं नातं जपणारी कविता सादर केली.तर नवोदित कवी रामेश्वर माने यांनी बाबासाहेबांच्या जीवन व कार्यावरील दीन- दलितांच्या आयुष्याचं सोनं करणारी सुंदर कविता सादर केली. त्याचबरोबर छत्रपती शिवरायांच्या कार्यावरील ‘स्वराज्याचा उद्गाता’ नावाची कविता सादर करून रसिकांच्या मनात वीर रसाचा संचार केला. कवी जरी नवोदित असले तरी अतिशय दर्जेदार अशा कविता सादर केल्या. या कविसंमेलनास इतरही अनेक कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बालाजी भंडारे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे कवी संमेलन म्हणजे नवोदित कवींसाठी एक अतिशय आनंदाची मेजवानी व प्रेरणा देणारी बाब ठरली.
