13 आरोपी गजाआड, 14 लाख रुपयांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू चा मुद्देमाल जप्त

0
13 आरोपी गजाआड, 14 लाख रुपयांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू चा मुद्देमाल जप्त

लातूर (प्रतिनिधी) पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी आयोजित केलेल्या गुटखा विरुद्ध मोहिमेच्या पहिल्या दिवशी, परिक्षेत्रात कलम 123 भारतीय न्याय संहिते अंतर्गत एकूण (9) गुन्हे दाखल करण्यात आले असून, गुटखा विक्री करणाऱ्या (13) आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले बहुतांश लोक हे पान टपरी चालक आहेत.

सदर मोहिमेअंतर्गत, परिक्षेत्रातील नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यात प्रत्येकी (2), तर लातूर जिल्ह्यात (3) अशा एकूण 9 कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवायांमध्ये एकूण 13 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेकडून एकूण ₹14,43,149/- किंमतीचा गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थांसह दोन वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत. उपरोक्त पदार्थांच्या संदर्भात, संबंधिताविरुद्ध कलम 123 बी एन एस अन्वये करण्यात आलेल्या कारवाईचा खटला हा सत्र न्यायालयात चालणारा असून त्यास दहा वर्षेपर्यंत कारावासासह द्रव्य दंडाची देखील शिक्षा आहे.

परिक्षेत्रात गुटखा व इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबविण्यात येत असून, सदर मोहिमेदरम्यान स्वादिष्ट/सुगंधित तंबाखू, अपमित्रके युक्त चघळण्याची तंबाखू, स्वादिष्ट/सुगंधित सुपारी, गुटखा, पान मसाला, खर्रा, मावा व तत्सम पदार्थांची साठवण, वितरण व वाहतूक याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123 अन्वये कारवाई करण्याच्या सूचना परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली या चारही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

राज्यात गुटखा विक्रीस बंदी असताना, स्थानिक पातळीवर पान टपऱ्यांच्या माध्यमातून होणाऱ्या विक्री विरुद्ध पहिल्या दिवशी पोलिसांनी आपली मोहीम उघडली आहे. पुढील काळात, पान टपऱ्या धारकांसोबतच, गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या साठवणूक व वाहतुकीविरुद्ध ही कारवाई अधिक व्यापकपणे राबविण्यात येणार आहे.

आपल्या भागात चालणाऱ्या अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचविणे सोपे व्हावे म्हणून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी जागरूक होऊन, आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!