अकोला कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ व्यंकट मायंदे यांची उदगीर येथे भेट
उदगीर (एल पी उगीले) अफार्म संस्थेचे अध्यक्ष तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकटराव मायंदे यांनी एचडीएफसी बँक अर्थसाहित व अफार्म संचलित उदगीर तालुक्यातील सर्वांगीण ग्रामीण विकास प्रकल्पास सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी अफार्मचे कार्यकारी संचालक सुभाष तांबोळी आणि प्रकल्प संचालक सचिन पुणेकर हे देखील सोबत होते. सर्वांगीण ग्रामीण विकास प्रकल्पाची अंमलबजावणी उदगीर तालुक्यातील 15 गावात करण्यात येत आहे. डॉ. व्यंकटराव मायेंदे यांनी अफार्मचे कार्यकारी संचालक सुभाष तांबोळी व प्रकल्प संचालक सचिन पुणेकर यांच्यासह प्रकल्पातील सताळा आणि लोहारा गावात भेट देऊन प्रकल्पाच्या कामाची तपासणी केली. सताळा गावात जलसंवर्धनाची कामे, स्मार्ट शाळा व गाव विकास समितीची तपासणी करून गावकरी आणि शाळेतील विद्यार्थ्यासोबत संवाद साधला. तसेच लोहारा गावात बेनीनाथ शेतकरी उत्पादक कंपनी स्थापित डाळ मिल उद्योग, गांडूळ खत निर्मिती केंद्र व सेंद्रिय कीटकनाशक उत्पादक केंद्र येथे भेट देऊन कामाची पाहणी केली, आणि कंपनीचे संचालक मंडळ यांच्यासोबत संवाद साधून माहिती घेतली. तसेच प्रकल्पातील इतर उपक्रम, फळबागा, शेतकऱ्यांना अवजार वाटप, अवजार बँक या उपक्रमाची माहिती घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली. सदर भेटीदरम्यान त्यांनी गाव विकास समिती, बेनीनाथ शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळ, शाळेतील विद्यार्थी तसेच गावकरी आणि प्रकल्पातील टीम यांना योग्य ते मार्गदर्शन केले.
डॉ. वेंकटराव मायंदे यांनी हैदराबाद येथील इकरीसॅट येथे 35 वर्ष कृषीशास्त्रज्ञ म्हणून काम केले आहे. त्यांच्या या कारकिर्दीत त्यांनी कृषी अवजार व डाळ मिल संबंधी अनेक शोध लावले आहेत.
सदर क्षेत्र भेट प्रकल्पाचे व्यवस्थापक श्री राजेंद्र इंगळे व प्रकल्प टीम यांच्या समन्वयातून सकारात्मक संवाद साधता आला. असे विचार बेनीनाथ शेतकरी उत्पादक कंपनीचे चेअरमन हंसराज मोमले यांनी व्यक्त केले आहेत.
