बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचा संकल्प
लायनेस क्लबची ऑनलाईन बैठकःसौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांचे प्रतिपादन
लातूर (प्रतिनिधी) : बचत गटाच्या माध्यमातून विविध कामे केल्यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या चांगले दिवस येत आहेत. ही बाब शहरी व ग्रामीण भागातून समोर येत आहे. त्यामुळे या नवीन वर्षात नवीन लायनेस क्लब स्थापन करून या लायनेस क्लबच्या माध्यमातून बचत गटांची स्थापना करून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा संकल्प आपण केला असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा लायनेस क्लबच्या उपप्रांतीय अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी केले आहे. यावेळी त्या जेएसपीएम अंतर्गत आयोजित महिला गटाच्या ऑनलाईन संवाद बैठकीत बोलत होत्या. यावेेळी जगताप मॅडम, अंबेसंगे मॅडम, मु.अ.सुनिता मुचाटे, मु.अ.अरूणा कांदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोेलताना प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, नवीन वर्षात नवीन संकल्प घेवून आपण पदार्पण केलेले आहे. त्यामुळे जेएसपीएम संस्थेच्या महिलांनी नवीन वर्षामध्ये नवीन बचतगट व नवीन लायनेस क्लब स्थापन करण्याचा संकल्प केलेला आहे. त्या संकल्पाला सर्वानुमते सम्मतीही देण्यात आलेली आहे. त्यामुळे या बचत गटाच्या माध्यमातून आणि लायनेस क्लबच्या महिलांना संघटीत करून त्यांना स्वावलंबी बनविण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
प्रारंभी सर्वानुमते नवीन बचतगटाच्या अध्यक्षा म्हणून जगताप यांची, कोषाध्यक्ष म्हणून पाटील यांची तर सचिव म्हणून वेदे मॅडम यांची एकमताने निवड करण्यात आली. प्रारंभी ऑनलाईन बैठकीचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन सुनिता मुचाटे यांनी केले तर आभार अरूणा कांदे यांनी मानले.
यावेळी जेएसपीएम संस्थेअंतर्गत येणार्या महिलांची मोठ्या संख्येन उपस्थिती होती.