ग्रामपंचायत निवडणुकीचा सोशल मीडियावर वाढला प्रचार
ग्रामीण भागात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
औसा (प्रशांत नेटके) : औसा तालुक्यातील 46 ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा जोर वाढला असून उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रचाराच्या तोफा धडाडताना दिसून येत आहे. निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार निरनिराळे फोटो आणि विडिओ, ऑडिओ तसेच फोटो व्हायरल करून आपला प्रचार करीत असल्याचे सोशल मीडियातून दिसून येत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकात सोशल मीडियाचा प्रभावी वापर होत असल्याचे दिसून येते, मात्र ग्रामीण भागातील महत्वाची समजली जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीतही सोशल मीडियाचा प्रभावी वापर उमेदवार करत आहेत. सोशल मीडियाच्या होणाऱ्या या प्रचाराने ग्रामपंचायत निवडणुकीत आता चांगलीच रंगत येऊ लागली आहे.
हजार पाचशेच्या नादी लागू नका, अभी नही तो कभी नही, माणूस आपल्या हक्काचा, इतिहास वाचायला नाहीतर लिहायला आलोय, अशा वेगवेगळ्या घोषणांचा वापर करून इच्छुक उमेदवार सोशल मीडियावर दणदणीत प्रचार करीत आहेत. दुसरीकडे अनेक विडिओ, ऑडिओ, चित्रांची जुळवाजुळव करण्याची रेलचेल, सोशल मीडियाच्या विविध साईटवर ऍपवर दिसून येत आहे. काहींनी तर भावी सरपंच असे पद लावून दम हाय नावात, आमचा नेता लई पावरफुल्ल, आया है राजा लोगो, असे विडिओ पोस्ट करत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियापासून कोसो दूर असलेले अनेक जण प्रचाराच्या माध्यमातून चमकत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक उमेदवार प्रत्यक्ष घरोघरी येऊन, अक्षरशः लहान थोरांच्या आशीर्वाद घेऊन हात जोडून नमस्कार करत आहेत.