महात्मा फुले महाविद्यालयात अहिल्यादेवी होळकर आणि आचार्य अत्रे यांना अभिवादन
अहमदपूर (गोविंद काळे) : भारतातील आदर्श राज्यकर्त्या आणि दानशूर म्हणून ज्ञात असलेल्या महाराणी अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथी निमित्त आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते, पत्रकार आणि लेखक, नाटककार आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना जयंतीनिमित्त येथील महात्मा फुले महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या वेळी इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या तर डॉ. अनिल मुंढे यांनी आचार्य अत्रे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. तर कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नागराज मुळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सतीश ससाणे यांनी केले. या वेळी क्रीडा विभाग प्रमुख डॉ. अभिजीत मोरे, इतिहास विभागाचे प्रा. संतोष पाटील, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर यांच्या सह महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचारी कोविडचे नियम पाळून उपस्थित होते.