कोरोना व लहान मुले; १२०० पालकांनी घेतला चर्चासत्राचा लाभ
लातूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या तिसऱ्या लाटे संदर्भात लहान मुलांची कशी काळजी घ्यावी? याबाबत तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळण्यासाठी रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन, रोटरॅक्ट क्लब ऑफ लातूर मिडटाऊन व श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चर्चासत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास १२०० पालक व नागरिकांनी या चर्चासत्रात सहभाग नोंदवत आपल्या प्रश्नांची सोडवणूक करून घेतली. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने रविवार दि.१५ ऑगस्ट रोजी श्रीकिशन सोमाणी विद्यालयात या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. लातूर शहरातील नामवंत बालरोग तज्ञ डॉ.सुबोध सोमाणी,डॉ.वर्धमान उदगीरकर,डॉ.इंद्रजित लकडे, डॉ.रवी रेड्डी,आयुर्वेद तज्ञ डॉ.आरती संदीकर यांनी या चर्चासत्रात मार्गदर्शन केले. कोरोनाची सर्वत्र चर्चा होते पण कोरोना म्हणजे नेमके काय ? पहिल्या व दुसऱ्या लाटेत लहान मुलांवर नेमके काय परिणाम झाले? मागचा अनुभव पाहता तिसऱ्या लाटेचे लहान मुलांवर काय परिणाम होऊ शकतात? याचे डॉक्टरांनी विवेचन केले. कोरोनाची सौम्य व गंभीर लक्षणे, प्रथमोपचार, तज्ञ डॉक्टरांची घ्यावी लागणारी मदत, आवश्यक उपाययोजना याच्या जोडीलाच आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कशी काळजी घ्यावी ? याबाबतही तज्ञांनी मार्गदर्शन केले.प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी नेमके काय केले पाहिजे,याबाबत माहिती देण्यात आली.
झूम,फेसबुक व युट्युबवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.या तिन्ही माध्यमातून १२०० पेक्षा अधिक नागरिक व पालकांनी यात सहभाग नोंदवला. रोटरीचे पवन मालपाणी यांनी प्रकल्प संयोजक म्हणून काम पाहिले. रोट्रॅक्टर वैष्णवी कुलकर्णी हिने संचलन केले तर वर्धमान उदगीरकर यांनी पालक व डॉक्टर यांच्यात प्रश्नोत्तरांसाठी समन्वय साधण्याची जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब, रोटरॅक्ट क्लब व श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.