ऑनलाईन फसवणुकीतील आरोपी राजस्थानातून अटकेत

ऑनलाईन फसवणुकीतील आरोपी राजस्थानातून अटकेत

उस्मानाबाद (सागर वीर) : जुनी मोटारसायकल व स्कुटर विक्रीस असल्याची जाहिरात फेसबुकवर बघून येणेगुर, ता. उमरगा येथील बालाजी गायकवाड यांनी जाहिरातीत नमूद क्रमांकार 10.08.2020 रोजी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. यावर समोरील व्यक्तीने आपले नाव किसन मोरे, रा. खेड, जि. पुणे असे सांगुण वाहनांची छायाचित्रे गायकवाड यांना व्हाट्सॲपद्वारे पाठवली असता गायकवाड यांनी सौदा पक्का केला. समोरील व्यक्तीने या वाहन विक्री पोटी आगाउ रक्कम 5,000 ₹ सांगीतलेल्या बँक खात्‍यात भरण्यास सांगीतले असता गायकवाड यांनी युपीआय प्रणालीद्वारे तशी रक्कम भरली. त्यानंतर 16.08.2020 रोजी समोरील व्यक्तीने गायकवाड यांना फोन करुन आपण दोन्ही वाहनांचा ताबा देण्यास येणेगूरपर्यंत आलो असून उर्वरीत 1,07,350 ₹ रक्कम दिलेल्या बँक खात्यात भरण्यास सांगीतली. अशा प्रकारे समोरील व्यक्तीने गायकवाड यांच्याकडून रक्कम उकळून आपला भ्रमणध्वनी कायमचा बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे गायकवाड यांच्या लक्षात आल्याने त्यांनी उमरगा पो.ठा. येथे गु.र.क्र. 426 / 2020 हा भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत नोंदवला आहे. नमूद तपास उस्मानाबाद सायबर पोलीस ठाण्यास हस्तांतरीत करण्यात आला असता सायबर पो.ठा. च्या पोनि- श्रीमती अर्चना पाटील यांच्यासह पथकाने तांत्रीक विश्लेषन करुन प्राप्त केलेल्या माहितीच्या आधारे उमरगा पो.ठा. च्या पोउपनि- श्री. दांडे, पोहेकॉ- संजय शिंदे, पोशि- म्हेत्रे यांचे पथक राजस्थानात रवाना झाले होते. पथकाने दि. 14 ऑगस्ट 2021 रोजी राजस्थानातील बाडमेर जिल्ह्यातून आरोपी- मोहंमद नेकु खान यांस अटक करुन सायबर पो.ठा. च्या ताब्यात दिले असून सायबर पोलीस त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घेत आहेत.
 

About The Author