शेतकऱ्यांना हातात रूमणे घेऊन यायची वेळ येऊ देऊ नका – दीलीपराव देशमुख

शेतकऱ्यांना हातात रूमणे घेऊन यायची वेळ येऊ देऊ नका - दीलीपराव देशमुख

रेणापूर (एल पी उगीले) : महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या वतीने शेतकऱ्यांची सतत अडवणूक केली जात आहे. एका बाजूला डीपी बसवण्यासाठी, पोल बसवण्यासाठी शेतकऱ्याकडून सर्रास पैशाची मागणी केली जाते आहे. हे थांबले पाहिजे. अन्यथा नाईलाज म्हणून आम्हा शेतकऱ्यांना हातात रुमणे घेऊन महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या कार्यालयात येऊन हिसका दाखवावा लागेल. ती वेळ येऊ देऊ नका. असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख मालक यांनी रेणापूर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अधिकारी थोरात यांना संवाद साधताना केले.

परवाच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भारतीय जनता पार्टीचे नेते माजी पालकमंत्री तथा आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तथा आमदार रमेशअप्पा कराड आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा नियोजन समितीचे सर्व सदस्य यांनी बैठकीमध्ये डीपी बसवण्याच्या मागणीसाठी आणि शेतकऱ्याचा छळ थांबवण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना इशारा देऊन बैठकीतून सभात्याग केला. भविष्यात शेतकऱ्यांचे प्रश्न सुटल्याशिवाय कोणत्याही शासकीय बैठकीला आपण उपस्थित राहणार नाही, किंवा आमचा कोणीही कार्यकर्ता उपस्थित राहणार नाही. असा इशाराही या प्रसंगी आमदार निलंगेकर यांनी दिला होता. मात्र असे असतानाही 48 तासात डीपीचे प्रश्न निकाली लावतो. असे आश्वासन देणाऱ्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी विनंत्या करून देखील अद्याप डीपी बसवलेल्या नाहीत.

अनेक ठिकाणी विद्युत पोलची मागणी होत असताना टाळाटाळ करून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याकडून पैसे काढण्याचे प्रकारही महामंडळाचे कर्मचारी करत असल्याचाही आरोप दिलीपराव देशमुख यांनी केला आहे. एका बाजूला गेल्या पंधरा वीस दिवसात पावसाने दिलेली ताडन आणि वीज मंडळाने मांडलेले खेळ! यामुळे शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडला आहे. हे प्रकार थांबवण्यासाठी नाईलाज म्हणून आक्रमक पवित्रा घ्यावा लागणार आहे. ती वेळ येऊ देऊ नका. म्हणून सौम्य भाषेत सांगण्यासाठी निवेदन देत आहोत. अनेक भागात शेतकऱ्यांना वीज उपलब्ध होत नाही. कधी कमी दाबाने तर कधी  जास्त दाबाने यामुळे अनेक ठिकाणच्या डीपी जळत आहेत, शेतकऱ्यांचा मोटारी जळत आहेत. अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीने सुलतानी संकटाला सामना करायची वेळ येऊ देऊ नका. असेही आवाहन याप्रसंगी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दीलीपराव देशमुख मालक यांनी केले आहे.

 याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे रेनापुर तालुका अध्यक्ष दशरथ सरवदे, पंचायत समिती सभापती रमेश सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गोडभरले, नगरसेवक उज्वल कांबळे, दत्ता सरवदे, राजकुमार आकनगिरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भविष्यात शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना पहिल्यांदा समज दिली जाईल आणि त्यानंतर ही कामे होत नसतील तर नाईलाज म्हणून तीव्र आंदोलनाचे हत्यार काढावे लागेल. असा इशाराही याप्रसंगी दिलीपराव देशमुख मालक यांनी दिला आहे.

About The Author