उदगीर येथे धर्मवीर संग्रामप्पा स्मृती दिनानिमित्त वचन सप्ताहाचे आयोजन
उदगीर (प्रतिनिधी) : थोर समाजसेवक, क्रांतीवीर, उदगीर वीरशैव समाजाचे संस्थापक अँड. धर्मवीर संग्रामप्पा शेटकार यांच्या ८२ वी पुण्यतिथीनिमित्त उदगीर वीरशैव समाजाच्या वतीने दि. १८ ते २४ ऑगस्ट २०२१ दरम्यान ८७ वा वचन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील वीरशैव समाज (संग्राम स्मा.विद्यालय) येथे दररोज सायं. ५ ते ६:३० या वेळेत या वचन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून बुधवार दि.१८ ऑगस्ट रोजी श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील प्रा. मनोहर भालके यांचे धर्म म्हणजे जगण्याची व आचरण करण्याची पध्दत या विषयावर व्याख्यान होणार असून यावेळी म. बसवेश्वर लिंगायत सेवाभावी मंडळाचे अध्यक्ष मनोहरराव पाटील भोपणीकर हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. गुरुवार दि.१९ ऑगस्ट रोजी अँड. रुक्मिणी सोनकांबळे यांचे म. बसवेश्वरांचे स्त्रियांविषयी दृष्टिकोन आणि आजच्या महिला संरक्षण विषयक कायदे या विषयावर व्याख्यान होणार असून कै. नागप्पा अंबरखाने ब्लड बँकेचे डॉ. बस्वराज शेटकार हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. शुक्रवार दि.२० ऑगस्ट रोजी श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील गणित विभाग प्रमुख प्रा. निलांबिका हुनगुंद(बडीहवेली) यांचे वीर वैराग्य अक्का महादेवी आणि वचन साहित्य या विषयावर व्याख्यान होणार असून पत्रकार राम मोतीपवळे हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. शनिवार दि.२१ ऑगस्ट रोजी म. उदयगिरी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. राहुल आलापुरे यांचे पर्यावरण व शाश्वत विकास या विषयावर व्याख्यान होणार असून जेष्ठ आडत व्यापारी मल्लिकार्जुनप्पा बिरादार लंजवाडकर हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. यावेळी म. उदयगिरी महाविद्यालयातील पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख प्रा. जय पटवारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. रविवार दि.२२ ऑगस्ट रोजी शिवाजी महाविद्यालयातील प्राणी विज्ञान विभागाच्या प्रा. डॉ. उर्मिला शिरसी (स्वामी) यांचे धर्मवीर संग्रामप्पा शेटकार व त्यांचे जिवनकार्य या विषयावर व्याख्यान होणार असून वीरशैव समाजाचे माजी अध्यक्ष परशुराम बिरादार हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. सोमवार दि.२३ ऑगस्ट रोजी डॉ. अनुप चिकमुर्गे यांचे कोरोना विषयक माहिती व संरक्षण या विषयावर व्याख्यान होणार असून उदगीर वकील संघाचे अध्यक्ष अँड. बालाजी पाटील हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. मंगळवार दि.२४ ऑगस्ट रोजी म. उदयगिरी महाविद्यालयातील प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांचे म. बसवेश्वर यांच्या वचन साहित्यातून मूल्यशिक्षण या विषयावर व्याख्यान होणार असून यावेळी जिल्हा न्यायाधीश परमेश्वर सुभेदार हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. बुधवार दि.२५ ऑगस्ट रोजी धर्मवीर संग्रामप्पा शेटकार यांचा स्मृतीदिन असून सकाळी ८ वा. वीरशैव समाज येथे वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार असून सकाळी १०:३० वा. ८२ वा. स्मृतीदिन कार्यक्रम व प्रा. डॉ. म. ई. तंगावार लिखित धर्मवीर संग्रामप्पा यांचे जिवन चरित्र आणि प्रा.डॉ. मनोहर भंडारे लिखित लिं. प्रभुरावजी कंबळीबाबा यांचे जिवन चरित्र या दोन पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून
उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी व न. प. प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीचे सहआयुक्त रामदास पाटील सुमठाणकर हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रभुराव कंबळीबाबा यांचे सुपुत्र शांतीकुमार उदगीरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे हे राहणार आहेत. हा वचन सप्ताह व स्मृतीदिन कार्यक्रम कोविड संसर्गामुळे सोशल डिस्टन्सचे पालन करून संपन्न होणार आहे. त्याचसोबत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांस उपस्थित राहण्याचे आवाहन उदगीर वीरशैव समाजाचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व सभासदांनी केले आहे.