बीज उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावाने पैसे मिळावेत
शिवसेनेचे कृषीमंत्र्यांना निवेदन
रेणापुरात सोयाबीन संशोधन केंद्र स्थापण्याची मागणी
लातूर (प्रतिनिधी) : महाबीज कंपनीचे बीज उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे पैसे मिळावेत.सोयाबीनचे मोठे क्षेत्र असणाऱ्या रेणापूर तालुक्यात सोयाबीन संशोधन केंद्र स्थापन करावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांना दिले. लातूर येथील कृषी महाविद्यालयात कृषीमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत सोयाबीन परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेस खा.ओमराजे निंबाळकर,आ.कैलास पाटील,आ. ज्ञानराज चौगुले यांचीही उपस्थिती होती. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कृषीमंत्र्यांची भेट घेवून मागण्यांचे निवेदन सादर केले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी,शिवाजीराव माने,महिला संघटक शोभाताई बेंजरगे, माजी जिल्हा प्रमुख नामदेव चाळक,महिला जिल्हा संघटक सुनीता चाळक,लातूर तालुका प्रमुख ॲड.प्रविण मगर, उपजिल्हाप्रमुख डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. लातूर ग्रामीण मधील रेणापूर तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली.
जिल्ह्यातील महाबीज बीज उत्पादक (seed plot) शेतकऱ्यांना ५३०० रुपयांच्या ऐवजी बाजारभावाप्रमाणे दर मिळावा.पुढील वर्षापासून बाजार भावाप्रमाणेच दर मिळावा.रेणापूर तालुक्यात सोयाबीन पीक संशोधन केंद्र स्थापन करण्यात यावे. तालुक्यातील मोटेगावसहित इतर काही दुष्काळप्रवण गावांचा पोखरा योजनेत समावेश करावा,आदी मागण्यांची स्वतंत्र निवेदने यावेळी देण्यात आली. येणाऱ्या वर्षी बाजाभवाप्रमाणेच भाव मिळावा अशी विनंती केली. कृषी मंत्र्यांनी शेतकरी व शिष्टमंडाळाची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून विविध विषयांची नोंद घेतली.या विषयांवर लातूरमध्ये लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ठाकरे सरकार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी लवकरच मोठे निर्णय घेणार आहे.यामुळे लातूर सोयाबीन उत्पादन आणि बाजारपेठेसाठी देशभरात ओळखले जाईल. दरवर्षी अशा राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय सोयाबीन परिषदेचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.