लातुरात प्रथमच बिनटाक्याची हृदयशस्त्रक्रिया

लातुरात प्रथमच बिनटाक्याची हृदयशस्त्रक्रिया

विवेकानंद रुग्णालयातील डॉक्टरांनी बंद केले ऱ्हदयाचे छिद्र

लातूर (प्रतिनिधी) : बालकाच्या हृदयाला असणारे छिद्र बंद करण्यासाठी विवेकानंद रुग्णालयातील डॉक्टरांनी कसलीही चिरफाड न करता शस्त्रक्रिया केली. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेसाठी हृदय बंद न करता चालू स्थितीतच शस्त्रक्रिया करून दुसऱ्याच दिवशी रुग्णाला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. लातुरात प्रथमच अशा पद्धतीची शस्त्रक्रिया पार पडली. एखाद्या बालकाच्या हृदयाला जन्मतः छिद्र असेल तर त्यासाठी हर्ट ओपन करावे लागते. मोठ्या प्रमाणात चिरफाड करावी लागते. ही शस्त्रक्रिया खर्चिक असते. या नव्या तंत्रज्ञानाने चिरफाड करण्याची गरज भासत नाही. एकही टाका न घालता रक्तवाहिन्यांच्या माध्यमातून ही शस्त्रक्रिया केली जाते.
आतापर्यंत पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरात ही शस्त्रक्रिया केली जात होती. लातुरात वयस्कर व्यक्तींच्या काही शस्त्रक्रिया अशा पद्धतीने पूर्वी केल्या गेली आहेत परंतु तीन वर्षांपर्यंतच्या बालकाची अशी शस्त्रक्रिया लातुरात प्रथमच झाली. ए एस डी अर्थात एट्रियल सेप्ट्रल डिफेक्ट म्हणजे हृदयातील एक प्रकारचे छिद्र आणि ए एस डी डिव्हास क्लोजर म्हणजे हे छिद्र चिरफाड न करता बंद करण्याची शस्त्रक्रिया. चाकूर तालुक्यातील एका तीन वर्ष वयाच्या बालकाच्या हृदयाला छिद्र होते. या माध्यमातून ते बंद करण्यात आले. नेहमीच्या पद्धतीने ही शस्त्रक्रिया केली असती तर रुग्णाला जवळपास एक आठवडा रुग्णालयात रहावे लागले असते. शिवाय मोठ्या प्रमाणात खर्चही आला असता. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून विवेकानंद रुग्णालयाने ही शस्त्रक्रिया मोफत केली. बाल ऱ्हदयरोग तज्ञ डॉ. नितीन येळीकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया पार पाडली. जवळपास पाऊण तास चाललेल्या या शस्त्रक्रियेसाठी डॉ.मंगलेश निंबाळकर, डॉ.शिवाजी माळी, डॉ.धनंजय माळणकर, डॉ.औरंगाबादकर, नेताजी भोईबार, दत्ता पळसे, विष्णू पंडगे, सोमनाथ कोकणे, शंकर जाधव यांच्यासह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
हृदयाला छिद्र असल्यानंतर बाळाला श्वास घेण्यास त्रास होतो, वजन वाढत नाही. याशिवाय न्युमोनिया सारखे आजार डोके वर काढतात. दोन वर्ष वयानंतर या हृदयविकारावर शस्त्रक्रिया केली जाते. अशा बालकाच्या हृदयाचे ठोके वेगळ्या पद्धतीने डॉक्टरांना तपासणी दरम्यान ऐकू येतात. त्यातून संशय आला तर रोग निदानासाठी हृदयाची सोनोग्राफी (२ डी इको) केली जाते, अशी माहिती डॉ.नितीन येळीकर यांनी दिली. पुढील काही दिवसात विवेकानंद रुग्णालयात बालकांच्या ऱ्हदया संदर्भातील सर्व शस्त्रक्रिया केल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे काका, डॉ.अरुणा देवधर, डॉ. ब्रिजमोहन झंवर, डॉ. राधेश्याम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनामुळेच ही शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकली, असेही ते म्हणाले.

About The Author