महात्मा बसवेश्वरांचे कार्य हे समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी – प्रा. मनोहर भालके

महात्मा बसवेश्वरांचे कार्य हे समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी - प्रा. मनोहर भालके

उदगीर (प्रतिनिधी) : महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकात अनिष्ठ रुढींच्या विरोधात प्रहार करून विज्ञानवादी व समतावादी दृष्टिकोन अंगिकारला. त्यांनी फक्त आपल्या धर्माचा नव्हे तर समस्त मानव जातीच्या कल्याणासाठीचा विचार केला असे विचार उदगीर येथील श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील प्रा. मनोहर भालके यांनी व्यक्त केले. उदगीर येथील वीरशैव समाजाच्या वतीने आयोजित ८७ वा धर्मवीर संग्रामप्पा शेटकार वचन सप्ताह व्याख्यानाची सुरुवात बुधवार दि.१८ ऑगस्ट २०२१ रोजी झाली. यावेळी प्रा. मनोहर भालके यांनी धर्म म्हणजे जगण्याची व आचरण करण्याची पध्दत या विषयावर पहिले पुष्प गुंफले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म. बसवेश्वर लिंगायत सेवाभावी मंडळाचे अध्यक्ष मनोहरराव पाटील भोपणीकर होते. बसवपिठावर वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे, उपाध्यक्ष प्रमोद शेटकार उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना प्रा. भालके यांनी, महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेला धर्म हाच आपल्या जगण्याचा आणि आचरणाचा मार्ग बनला पाहिजे. माणूस धर्माकरीता नसून धर्म माणसाकरीता आहे, सदाचरण हेच स्वर्गप्राप्तीचे साधन असले पाहिजे, दुराचरण म्हणजे नरक होय असे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस म. बसवेश्वर व धर्मवीर संग्रामप्पा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय वीरशैव समाजाचे सचिव अँड.श्रीकांत बडीहवेली यांनी केले. सूत्रसंचालन रविंद्र हसरगुंडे यांनी केले. आभार उत्तरा कलबुर्गे यांनी मानले. कार्यक्रमास समाजबांधव उपस्थित होते.

About The Author