राणेंनी मुख्यमंत्र्यांचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला आहे – चंद्रकांत टेंगेटोल

राणेंनी मुख्यमंत्र्यांचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला आहे - चंद्रकांत टेंगेटोल

उदगीर (एल.पी. उगिले) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याच्या कानशिलात लगावण्याची भाषा करून केवळ मुख्यमंत्र्यांचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी आणि अपमान केला आहे. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट राणे यांनी केलेली आहे. तसा तो त्यांचा स्वभावच आहे. यापूर्वीही शिवसेनेवर गरळ  ओकलेली आहे,तशी एवढीच काय ती त्यांची कर्तबगारी आहे. असे वक्तव्य शिवसेनेचे उदगीर तालुका प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी व्यक्त केले. राणे यांच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश असल्यामुळे लोकशाही मार्गाने नारायण राणे यांच्या प्रतिमेला “जोडे मारो आंदोलन” करत नारायण राणे यांच्या प्रतिमेचे दहन शिवाजी चौकात करण्यात आले. राणे यांनी शिवसैनिकांच्या आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. महाराष्ट्राच्या अस्मितेला हानी पोहोचवणे याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा. अशी मागणीही शिवसेनेच्या उदगीर तालुका कार्यकारिणीने केली आहे. यासंदर्भात रीतसर निवेदनही उदगीर शहर पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांना देण्यात आले आहे. सदरील निवेदनावर शिवसेना विधानसभा संघटक श्रीमंत सोनाळे, विलास बिरादार, शहर प्रमुख दत्ता मोरे, तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, सचिन साबणे, अरुणाताई लेंडाणे, अरुण बिरादार, एडवोकेट विष्णुकांत चींतलवार, अंकुश कोनाळे, गुणवंत बिरगे, सुरेश गर्जे, गुणवंत हल्लाळे, अरुण बिरादार, अविनाश राठोड, रामदास काकडे, मच्छिंद्र मोरे, अनिल मोरे, प्रदीप पांचाळ, संजय मठपती, व्यंकट साबणे, बालाजी भंडे, अर्जुन आटोळकर, श्याम तौर, प्रदीप पाटील आदींच्या सह्या आहेत.

 या अनुषंगाने पुढे बोलताना चंद्रकांत टेंगटोल यांनी स्पष्ट केले की, नारायण राणे यांना शिवसेनेच्या स्टाईलमध्ये देखील उत्तर देता येते, मात्र महाराष्ट्राच्या संस्कृतीचा विचार करून आम्ही तसे शब्द शक्यतो वापरण्याचे टाळतोय. मात्र शिवसैनिकांच्या सहनशीलतेची सीमा जर राणे यांनी ओलांडली तर निश्चित त्यांना धडा शिकवावा लागेल.प्रशासनाने तात्काळ राणे यांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करावेत, आणि महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था, शांतता टिकून राहील या दृष्टीने प्रशासनाने कारवाई करावी. अशी विनंती सदरील निवेदनात करण्यात आली आहे.सदरील निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी,उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

About The Author