हेल्मेटचा एक निर्णय वाचवू शकतो जीव; हेल्मेट न घातल्याने दोन दुचाकी चालकांचा दुर्दैवी मृत्यू”

0
हेल्मेटचा एक निर्णय वाचवू शकतो जीव; हेल्मेट न घातल्याने दोन दुचाकी चालकांचा दुर्दैवी मृत्यू"
 लातूर (एल पी उगीले) रस्ते अपघातांमध्ये होणारे मृत्यू कमी करण्यासाठी शासन, पोलीस प्रशासन आणि विविध सामाजिक संस्थांकडून सातत्याने जनजागृती करण्यात येत असतानाही अनेक वाहनचालक हेल्मेट वापरण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. या निष्काळजीपणाची मोठी किंमत जीव गमावून मोजावी लागत असल्याचे दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटनांमधून समोर आले आहे. लातूर जिल्ह्यातील जळकोट व निलंगा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या दोन स्वतंत्र अपघातांमध्ये हेल्मेटचा वापर न केल्यामुळे दोन तरुण दुचाकी चालकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
                जळकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक २२ मे २०२६ रोजी कपील बालाजी ज्योते (वय १८ वर्षे) हा युवक त्याची मोटारसायकल क्रमांक एमएच-२४-एस-६२९६ घेऊन तहसील रोड, जळकोट येथे जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल घसरून पडली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
                  तसेच निलंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक ०६ जून २०२६ रोजी किरण शिवाजी राठोड (वय २६ वर्षे) हा स्कुटी क्रमांक एमएच-२४-बीवाय-६३५४ ने केळगाव ते निलंगा मार्गावर प्रवास करत असताना धन्वंतरी हॉटेलसमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक एमएच-२४-एबी-९१०९ ला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तो गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
                दोन्ही घटनांमध्ये मृत वाहनचालकांनी हेल्मेट परिधान केलेले नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अपघाताच्या वेळी डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांनी दर्जेदार हेल्मेटचा वापर केला असता तर त्यांचा जीव वाचण्याची शक्यता नाकारता येत नाही.हेल्मेट हे केवळ वाहतूक नियमांचे पालन नसून जीवनरक्षक कवच आहे. बहुतांश प्राणघातक अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमुख कारण डोक्याला होणारी गंभीर दुखापत हेच असते. त्यामुळे दुचाकी चालक तसेच मागे बसणाऱ्या प्रवाशांनीदेखील प्रत्येक वेळी हेल्मेटचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.
                लातूर जिल्हा पोलीस दलामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी दुचाकी चालविताना नेहमी दर्जेदार आयएसआय मानांकित हेल्मेटचा वापर करावा, वाहतूक नियमांचे पालन करावे व सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे. एक छोटी काळजी आणि एक हेल्मेट आपल्या कुटुंबातील व्यक्तीचा अमूल्य जीव वाचवू शकते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!