कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पालकांच्या मुलांसाठी बी.ए. मध्ये मोफत प्रवेश
गुणवत्ता विकासाच्या दोन दशक पूर्तीनिमित्य अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम
अहमदपूर (गोविंद काळे) : कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या पालकांच्या मुलांसाठी ‘कोव्हिड १९’ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२वर्षाकरिता बी.ए. मध्ये मोफत प्रवेशाची सोय करण्यात आली असुन महात्मा फु ले महाविद्यालयाच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाविद्यालय स्थापना व गुणवत्ता विकासाच्या दोन दशक पूर्तीनिमित्य ‘कोव्हिड १९’ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२या वर्षाकरीता कोरानामुळे मृत्यु पावलेल्या पालकांच्या मुलांसाठी बी.ए. मध्ये मोफत प्रवेशाची सोय करण्यात आली आहे.
यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, कोरोनामुळे पालकांचे निधन झाले असल्यास पदवीपर्यंत शिक्षणाचे पालकत्व महाविद्यालयाकडून स्वीकारले जाणार आहे. तसेच आमच्या महाविद्यालयाची दर्जेदार शिक्षणाची परंपरा राहिलेली आहे. संस्कार, शिस्त, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकी जोपासून गुणवत्तेत नेहमीच अग्रक्रमांकावर महाविद्यालय राहिलेले आहे. आमचे महाविद्यालयास बी ग्रेड नामांकन प्राप्त झाले असुन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड कडून शैक्षणिक मूल्यांकनामध्ये ‘ए’ ग्रेड प्राप्त आहे.
तसेच महाविद्यालयात एन.एस. एस. विविध खेळ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, सुसज्ज ग्रंथालय, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राची सोय, गांधी विचार संस्कार परीक्षेची सुविधा, तसेच सुसज्ज संगणकीकरणीय प्रशासन विभाग इत्यादी अनेक सोयी उपलब्ध आहेत. मुलींच्यासाठी सर्व सुविधांनी युक्त व सुरक्षित महाविद्यालय आहे. सर्वांगिण विकासासाठीचे विविध उपक्रम सातत्याने आम्ही राबवतो.
कोरोनामुळे ज्या पालकांचे निधन झाले आहे अशा पालकांच्या पाल्यांनी प्रवेशासाठी महाविद्यालयात तातडीने संपर्क करुन प्रवेश घ्यावा. विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश लवकर निश्चित करावा, असे आवाहनही प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले आहे.