खेळातून खिलाडूवृत्ती विकसित होते – प्रा. डॉ. आर. आर. तांबोळी
उदगीर : दिनांक ( 29 ऑगस्ट 2021 ) खेळ प्रत्येक माणसाला सकारात्मक विचार करायला शिकवतो तसेच प्रेरणा देण्याचे कार्य करतो. खेळामध्ये हार-जीत यापेक्षा खिलाडूवृत्ती विकसित होते हे अधिक महत्त्वाचे असते, असे मत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी यांनी व्यक्त केले. ते राष्ट्रीय खेळ दिनानिमित्त क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित मेजर ध्यानचंद अभिवादन कार्यक्रमानंतर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के ( व. म. ), उपप्राचार्य प्रा. आर. एन. जाधव ( क. म. ), प्रा. सी. एम. भद्रे ( पर्यवेक्षक ), डॉ. गौरव जेवळीकर, क्रीडा संचालक प्रा. सतीश मुंढे, रोहन ऐनाडले, श्री. महेश बिलापटे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. तांबोळी म्हणाले, देशाचे नाव मोठे करण्यासाठी खेळावरती मनापासून प्रेम करा व नियमित खेळत रहा. डॉ. आर. के. मस्के म्हणाले, खेळाल तरच वाचाल. खेळ संस्कृती मेजर ध्यानचंद यांनी निर्माण केली. तोच आदर्श आपण पुढे चालवला पाहिजे. डॉ. जेवळीकर म्हणाले, मार्कांसाठी खेळ नको तसेच मोबाईलवरचाही खेळ नको. मैदानावरील खेळ संस्कृती निर्माणासाठी तरुणाईने सातत्यपूर्ण खेळाकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे तरच आपल्या देशातील ऑलम्पिक पदकांची स्थिती बदलेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार क्रीडा संचालक प्रा. सतीश मुंढे यांनी मानले. यावेळी शिरूर ताजबंद व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर येथील संघादरम्यान क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता. यासाठी अनेक क्रीडाप्रेमी विद्यार्थी उपस्थित होते.