चोरट्यांना वाटले आपणच लय भारी !! ग्रामीण पोलिसांची गाजते दमदार कामगिरी !!

चोरट्यांना वाटले आपणच लय भारी !! ग्रामीण पोलिसांची गाजते दमदार कामगिरी !!

उदगीर ( एल.पी.उगीले ) : गेल्या महिनाभरापासून उदगीर ग्रामीण पोलिसांची तपासाची मोहीम गतीमान झाली आहे. अत्यंत गुंतागुंतीचे आणि क्लिष्ट असलेले गुन्हे उघड करण्यात उदगीर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. विशेषत: सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळून जाणारे चोरटे असतील नाहीतर जबरी चोरी करून पैसे आणि दागिने घेऊन पळणारे चोर असतील, त्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

 दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास देवर्जन येथील एक वयोवृद्ध महिला सागरबाई दत्तू कांबळे (वय 60 वर्ष )ही वैद्यकीय उपचार घेण्यासाठी उदगीरला निघाली. देवर्जन येथून अज्ञात ऑटोमध्ये ती बसून उदगीर कडे येत असताना या अज्ञात आटो चालकाने आणि त्याच्या साथीदाराने या वृद्ध महिलेला देवर्जन येथून शेकापुर मार्गे उदगीरला आणले खरे, मात्र उदगीर शहरात न येता पुढे आरटीओ ची चेकिंग चालू आहे. या मार्गाने जाता येणार नाही म्हणून दुसऱ्याच रोडणे ध्रुपद  माता शाळेसमोर आणले, आणि तिथे तिच्या अंगावरील सोन्याची पोत किंमत 27 हजार रुपये आणि तिने औषध पाण्यासाठी म्हणून सोबतच्या बटव्यात ठेवलेल तीन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन चोरटे पसार झाले.

 वयोवृद्ध महिला असहाय्यपणे इकडे तिकडे पाहत होती. निर्जन रस्ता! अनोळखी ठिकाण आणि आपल्या जवळ कवडीही नाही! अशा परिस्थितीत ती हतबल झालेली महिला कोणीतरी आपल्याला मदतीला येईल का? म्हणून वाट पाहत होती. मात्र तिच्या मदतीला कोणी आले नाही. चोरटे आटो घेऊन लंपास झाले!

 ती असहाय्य झालेली महिला विचारत विचारत शहरात आली. या घटनेच्या अनुषंगाने उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुरन 347/ 21 कलम 392 ,34 भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा नोंद झाला. पोलिसांच्या समोर मोठे प्रश्नचिन्ह होते. आरोपीला शोधायचे कसे? ना आरोपींचा ठावठिकाणा, ना निश्चित ओळखीच्या खुणा! तरीही ज्येष्ठ पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल जॉन बेन यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक बालाजी पल्लेवाड यांच्याकडे सोपवला. त्यांच्या मदतीसाठी स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार राम बनसोडे, राहुल गायकवाड, तुळशीराम बरुरे, राहुल नागरगोजे आणि पोलीस हवालदार माधव केंद्रे यांनी तपासाला गती दिली. तपासाची सुरुवात नेमकी कुठून करावी? असा प्रश्न होता. त्या वयोवृद्ध महिलेला स्पष्टपणे त्या 20 ते 25 वयोगटातील चोरट्यांचे वर्णन करता येत नव्हते, किंवा ऑटो च्या संदर्भात ही नेमके काही सांगता येत नव्हते! तरीही सुतावरून स्वर्ग गाठणे म्हणतात, तशा पद्धतीने ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने प्रयत्न चालवले होते. अगदी आठ दिवसात या चोरट्यांचा शोध लावून मुद्देमाल जप्त करण्यात पोलिस तपास पथक यशस्वी झाले आहे. अत्यंत क्लिष्ट अशा या गुन्ह्यात पोलिसांनी गेला मला जप्त केल्या बद्दल उदगीर ग्रामीण पोलिसांच्या सर्व तपासी अंमलदार आणि अधिकारी यांचे अभिनंदन केले जात आहे.

 याच महिन्यात सव्वा लाखाचे गंठण पळवणार्‍या चोरट्यांना देखील ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती, आणि त्याच्याकडून गेला मला जप्त केला होता. अशा पद्धतीची उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस प्रशासनाबद्दल शहरात आणि परिसरात चांगले मत बनत आहे.

About The Author