आ. बाबासाहेब पाटील यांनी दिले अहमदपूर तालुक्यातील आरोग्यविषयक मागण्यांसाठी आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांना निवेदन

आ. बाबासाहेब पाटील यांनी दिले अहमदपूर तालुक्यातील आरोग्यविषयक मागण्यांसाठी आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांना निवेदन

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री मा.राजेशजी टोपे यांना आमदार बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन मिळणेसाठी विविध मागण्यांचे निवेदन दिले.यामध्ये अहमदपूर तालुक्यातील विविध विषयांवर प्रकाश टाकून त्यांची प्रामुख्याने दखल घेण्यात यावी अशी आग्रही मागणी यावेळी श्री.राजेशजी टोपे यांच्याकडे करण्यात आली. यात पुढीलप्रमाणे मुद्दे मांडण्यात आले.

१. ग्रामीण रुग्णालय अहमदपूर जि.लातूर या रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतर करण्यात यावे जेणे करुन खाटांची संख्या वाढेल व अधिक संख्येने वैद्यकीय अधिकारी,प्यारामेडीकल कर्मचारी उपलब्ध होऊन जनतेला सर्व प्रकारचे आवश्यक उपचार मिळतील.
२. अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयातील ट्रामाकेअर युनिटसाठी कर्मचारी व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करावी.
३.अहमदपूर ग्रामीण रुग्णालयासाठी कार्डियाक अॅम्बुलन्स उपलब्ध करुन देण्यात यावी.
४.बायोमेडीकल वेट्स लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यासाठी एकच कार्यालय आहे. सदर कार्यालयातून वेळेवर प्रतिसाद मिळत नसल्याने वैद्यकीय सेवेतील खाजगी व शासकीय रुग्णालय यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या कार्यालयाचे विकेंद्रीकरण व्हावे आणि तालुका स्तरावर बायोमेडीकल वेट्स जमा करणारी संस्था उभारण्याबाबत कार्यवाही व्हावी.
५. अहमदपूर येथे तालुका स्तरावर सुसज्ज मेडिकल लॅब व ग्रामीण भागात मोबाईल मेडिकल लॅब उपलब्ध करुन देण्यात यावी.
६. शासकीय व खाजगी डॉक्टरसाठी डॉक्टर भवन बांधकाम करण्याबाबत मागणी आहे. त्यासाठी आवश्यक शासकीय जागा व बांधकामासाठी विशेष निधी उपलब्ध करुन देण्यात यावा.

वरील सर्व विषयावर आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांच्या बरोबर सकारात्मक चर्चा झाली. या विषयावर योग्य आणि सकारात्मक निर्णय लवकरच घेऊ याची ग्वाही यावेळी राजेशजी टोपे यांनी आमदार बाबासाहेब पाटील यांना दिली.

About The Author