तंटामुक्त, टंचाईमुक्तीबरोबर दारूमुक्तीसाठी स्मार्ट व्हिलेज कव्हा विकास पॅनलला मतदानरूपी साथ द्या – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : लातूरच्या धर्तीवर कव्ह्याचा चौफेर विकास केलेला आहे. गावातील रस्ते, नाल्या व पाण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. भांडखोर गाव म्हणून ओळख असलेले कव्हा हे गाव तंटामुक्त झाले असून या गावाला तंटामुक्तीचे बक्षीसही मिळालेले आहे. त्यामुळे तंटामुक्त, टंचाईमुक्त, गावाबरोबरच आता दारूमुक्त गाव करण्यासाठी स्मार्ट व्हिलेज कव्हा विकास पॅनलला मतदानरूपी साथ द्या, असे आवाहन माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते कव्हा येथील राजीव नगर भागात आयोजित स्मार्ट व्हिलेज कव्हा विकास पॅनलच्यावतीने आयोजित प्रचार सभेत बोलत होते. यावेळी प्रा.गोविंद घार, भागवत घार, नगरसेवक अजिसिंह पाटील कव्हेकर, सुभाषअप्पा सुलगुडले, जेएसपीएमचे समन्वयक निळकंठराव पवार, किशोरदादा घार, अनिता घोडके, सदाशिव सारगे, नेताजी मस्के आदी मान्यवरांची उपस्थित होती.
यावेळी पुढे बोलताना कव्हेकर म्हणाले, कव्हा गावचा चौफेर विकास करण्याचे काम केलेले आहे. जेएसपीएमचा अध्यक्ष म्हणून काम करीत असताना कव्ह्यामध्ये 10 वी पर्यंतची शाळा सुरू केली. यापुढील कालावधीत कव्हेकरांची साथ कायम राहीली तर लातूरातील स्वामी विवेकानंदाच्या धर्तीवर कव्ह्यातही सुसज्ज असे शैक्षणिक संकूल उभे करू. तसेच कव्ह्यातील तरूणांना गावातही रोजगार मिळावा यासाठी कृषी कंपनी उभी करू. आणि या माध्यमातून तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम करू, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. एम.एन.एस.बँकेच्या माध्यमातून 8 ते 10 कोटीचे कर्ज मिळवून देण्याचे काम केलेले आहे. कव्ह्यातून रात्री 12 ला जरी फोन आला तरी कव्हेकरांना न्याय मिळवून देण्याचे काम आपण केलेले आहे. त्यामुळे हा विकासाचा रथ पुढे घेवून जाण्यासाठी स्मार्ट व्हिलेज कव्हा विकास पॅनलला भरभरून मतदानरूपी साथ द्या, असे आवाहनही भाजपा नेते माजी आ.कव्हेकर यांनी केले.
एकसंघपणा कायम ठेवण्यासाठी स्मार्ट व्हिलेज पॅनलला विजयी करा – प्रा.गोविंद घार
कव्हा गावच्या विकासाचे स्वप्न माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या व सर्वांच्या सहकार्यातून पूर्ण हेात आहे. त्यामुळे गावातील विकासाची गती कायम ठेवून गावामध्ये एकोपा कायम ठेवणे गरजेचे आहे. आजपर्यंत अनेकदा कव्हा ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यात आली. यावेळेसही सर्वांनी प्रयत्न केले. परंतु ते सिध्द झाले नाही. त्यामुळे गावातील एकसंघपणा कायम ठेवण्यासाठी स्मार्ट व्हिलेज पॅनलला विजय करा, असे आवाहन शिक्षक तज्ज्ञ प्रा.गोविंद घार यांनी केले.
कव्ह्याची ओळख कायम राहण्यासाठी कव्हेकरांना साथ द्या- अजितसिंह पाटील कव्हेकर
भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी कव्ह्यातील रस्ते, नाल्या व सर्वसामान्यांना घरकुल मिळवून देण्याचे काम केलेले आहे. तसेच कव्ह्यातील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न मिटावा,त्यांना स्वस्तात उपचार मिळावे यासाठी तत्कालिन आरेाग्य मंत्री जे.पी.नड्डा यांच्याकडे पाठपुरावा करून प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचे काम कव्हेकर साहेबांनी केलेले आहे. तसेच पशुवैद्यकीय दवाखाना 22 एकरमध्ये विभागीय क्रीडा संकूलाला मंजुरी मिळवून कव्ह्याचा चौफेर विकास करण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे 40 वर्षामध्ये केलेल्या विकास कामातून कव्ह्याची ओळख कायम राहण्यासाठी कव्हेकरांना मतदानरूपी साथ द्या, असे आवाहन भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले आहे.