गणेशोत्सव सजावटीसाठी वैविध्यपूर्ण पर्याय उपलब्ध – १० ते १५ टक्के दरवाढ
नाशिक (रोहीत टोम्पे) : गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला असून सजावटीचे साहित्य मोठय़ा प्रमाणावर बाजारात दाखल झाले आहे. गणेशोत्सवावर यंदाही करोनाचे सावट असले तर घरगुती का होईना गणपती उत्सव वेगळ्या प्रकारे साजरा करण्यासाठी लगबग वाढली आहे. रंगीत फु लांच्या माळा, आकर्षक विद्युत रोषणाई यांसह वैशिष्टय़पूर्ण साहित्य बाजारात दाखल झाले आहे. सजावटीच्या साहित्यात मागील वर्षांच्या तुलनेत १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. करोनामुळे सार्वजनिक मंडळांच्या अर्थकारणावर परिणाम झाला असला तरी वर्गणीसाठी करण्यात येणाऱ्या दादागिरीचा त्रासही त्यामुळे कमी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये काही प्रमाणात समाधानही आहे. दुसरीकडे, शहराच्या मुख्य बाजारपेठेत झालेल्या खोदकामामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
बाजारात ऑर्किड, झेंडू, शेवंती, गुलाब, मोगरा यांसह अन्य फु लांच्या प्लास्टिक माळा आल्या आहेत. याशिवाय मोती, कु ंदन काम असलेली रंगबेरंगी तोरणे, पूजेची आकर्षक थाळी, डोक्यावरील फु लांची छत्री तसेच थर्माकोलवर बंदी असल्याने फोममधील लाकडी मखर भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. कमळ, करंडा, मंदिर अशा वेगवेगळ्या आकारात मखर उपलब्ध आहेत. मोजक्या साहित्याचा वापर करत घरच्या घरी मखर तयार करण्याला ग्राहकांची पसंती मिळत आहे.
मागील आठवडा शांततेत गेला, परंतु तीन-चार दिवसांत गर्दी वाढत आहे. यंदा फु लांच्या लडी, पानांचे वेल, वेलवेट हार, सुटे फु ले, जरीचे पडदे याशिवाय काही फॅ न्सी प्रकार आले आहेत. ग्राहकांना परवडतील अशा ३० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत एका वस्तूसाठी द्यावे लागत आहे. मागील वर्षांच्या तुलनेत १० ते १५ टक्के वाढ असली तरी प्लास्टिक झेंडू, हरित गालिचा यांना चांगली मागणी असल्याचे ज्योती नॉव्हेल्टीचे नरेश करिया यांनी सांगितले.
दुसरीकडे, गौरी-गणपतीची सजावट करणाऱ्यांची करोनाच्या सावटामुळे मोठी कामे हातातून गेली आहेत. सार्वजनिक मंडळ असो की उद्योग, व्यावसायिक त्यांच्याकडे यंदा फारशी कामे नाहीत. उत्सवातील डामडौलपणा हरवला आहे. लोक साधेपणाने उत्सव साजरे करत आहेत. याआधी दोन ते तीन महिने देखावे, सजावटीचे काम चालत असे. मात्र यंदा उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला तरी कामाविषयी विचारणा नाही. किरकोळ कामे सुरू असल्याची खंत मयूर मोरे यांनी व्यक्त केली.