शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन दाने कोरोनावीर पुरस्काराने सन्मानित
लातूर (प्रतिनिधी) : शिवसेनेचे लातूर ग्रामीण उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांना एकता प्रतिष्ठानच्या वतीने आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते कोरोनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोरोनाच्या काळात डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी व समाजसेवकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केले, रुग्णांची सेवा केली. मानवतेच्या भूमिकेतून त्यांनी केलेल्या या कार्याची दखल घेत एकता प्रतिष्ठानच्या वतीने कोरोनावीर हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कस्पटे यांच्या पुढाकारातून पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.यावेळी माजीमंत्री आ. महादेव जानकर उद्घाटक म्हणून उपस्थित होते.माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, भाजयुमोच्या प्रदेश सचिव प्रेरणाताई होनराव यांच्यासह मान्यवरांची पाहुणे म्हणून उपस्थिती होती. कोरोना संकटात सचिन दाने यांच्या पुढाकारातून गावोगाव जनजागृती मोहीम राबवत रुग्णांना धीर देण्याचे काम करण्यात आले. प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह नागरिकांना मास्क व सॅनिटायझर पुरविण्यात आले. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना सेफ्टी किट अर्थात मास्क, हातमोजे, सॅनिटायझर वाटप केले गेले. लसीकरणाबाबत जनजागृती करून कोविड सेंटर मध्ये रुग्णांना मदत करण्यात आली. मोफत अन्न सेवेचा लाभ हजारो रुग्णांना देण्यात आला.या कार्याची दखल घेत आ. निलंगेकर यांच्या हस्ते दाने यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्काराला उत्तर देताना सचिन दाने म्हणाले की, हा पुरस्कार माझ्या पडद्यामागच्या सहकाऱ्यांचा व शिवसैनिकांचा आहे. आरोग्य कर्मचारी, पोलीस प्रशासन, स्वच्छता करणारे कर्मचारी, अंत्यविधी करणारे स्वयंसेवक, रुग्णवाहिका चालक, परिचारिका व ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या सर्वांनाच आपण हा पुरस्कार समर्पित करत असल्याचे त्यांनी सांगितले.