रेणापुरात स्व.देशमुख व स्व. मुंडे यांचे स्मारक उभारावे – सचिन दाने
शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
रेणापूर (प्रतिनिधी) : स्व. विलासराव देशमुख व स्व. गोपीनाथराव मुंडे या दोघांनीही रेणापूर तालुक्यात काम केलेले आहे. त्यांच्यामुळे राज्य व देश पातळीवर या तालुक्याचा नावलौकिक झालेला आहे. त्यामुळे रेणापूर येथे या दोन्ही नेत्यांचे स्मारक उभे केले जावे, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या निवेदनात दाने यांनी म्हटले आहे की, स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी विधानसभेत रेणापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. अनेक वर्ष ते या भागाचे लोकप्रतिनिधी होते. स्व. विलासराव देशमुख यांनीही रेणापूर तालुक्यात काम केले. तालुक्याच्या जडणघडणीत या दोन्ही नेत्यांचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे रेणापूर येथे या दोन्ही नेत्यांचे स्मारक उभारले जावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. यासंदर्भात बोलताना सचिन दाने म्हणाले की, राजकीय अनास्थेमुळे स्मारकाचा विषय मागे पडला आहे.स्थानिक नेते हा मुद्दा विसरून गेले आहेत.या दोन्ही नेत्यांचे स्मारक व्हावे यासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून आपण पुढाकार घेणार असल्याचे ते म्हणाले. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना हे निवेदन पाठवण्यात आले. या निवेदनावर सचिन दाने यांच्यासह पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून दैनिक जगमित्र चे ग्रामीण प्रतिनिधी कोंडीराम काळे यांची स्वाक्षरी आहे.