शेतकऱ्यांचे सोयाबीन पाण्यात
अनियंत्रित पाणी सोडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
रेणापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्प भरल्यानंतर नदीपात्रात पाणी सोडताना अधिकाऱ्यांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे नदीकाठच्या शेतकर्यांचे सोयाबीन पाण्यात बुडाले. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. या नुकसानीची तात्काळ पाहणी करून शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे. भंडारवाडी येथे रेणा मध्यम प्रकल्प आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने हा प्रकल्प काठोकाठ भरला. पाच वर्षानंतर प्रकल्प भरल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.प्रकल्प भरल्यानंतर अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याचे कसलेही नियोजन केले नाही.पाणी नदीपात्राच्या बाहेर येऊ नये, याची दक्षता अधिकाऱ्यांनी घेतली नाही.
पाण्याची आवक लक्षात घेता विसर्ग करणे गरजेचे असताना कमी कालावधीत अधिक पाणी सोडण्यात आले.परिणामी भंडारवाडी येथे नदीपात्रालगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक शेतात पाणी साठवून राहिल्याने खराब झाले. नदीकाठी शेती असणाऱ्या फुलाबाई आकनगिरे यांचे १ हेक्टर ६२ आर, नितेश अंतराम वांगे यांचे १ हेक्टर ६०आर व रमेश संतराम वांगे यांचे १ हेक्टर ६० आर सोयाबीन या पाण्यामुळे वाया गेले. परिसरातील असंख्य शेतकऱ्यांचे सोयाबीन या पाण्यामुळे वाया गेले. पालकमंत्री अमित देशमुख यांनी संबंधितांना या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई मिळवून द्यावी प्रकल्पातून पाणी सोडताना खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी फुलाबाई आकनगिरे, नितेश वांगे व रमेश वांगे यांनी केली आहे.