शासनाच्या निर्देश पाळून यंदाचा गणेशोत्सव साजरा करावा – अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव

शासनाच्या निर्देश पाळून यंदाचा गणेशोत्सव साजरा करावा - अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव

अहमदपूर (गोविंद काळे) : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव शासनाचे निर्देश पाळत अतिशय साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन लातूर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव यांनी केले.अहमदपूर पोलीस उपविभागाच्या अंतर्गत सर्व पोलीस ठाण्यातील गावांमध्ये गणेशोत्सव व नवरात्रोत्सव निमित्ताने शांतता कमिटीची बैठक शहरातील प्रसाद गार्डन येथे ८ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. याप्रसंगी अध्यक्षीय समारोपात करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंचायत समितीच्या सभापती गंगासागर जाभाडे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, नगराध्यक्षा आश्विनीताई कासनाळे,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय बिराजदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाड,जळकोट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी.बी.कदम, वाढवणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पाशा पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना हिम्मतराव जाधव पुढे म्हणाले की, यंदाचा गणेशोत्सव हा भपकेबाजपणा न करता साध्या पध्दतीने साजरा करावा कारण कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही.गणेश मंडळानी वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, शालेय विद्यार्थ्यांसाठी ई- लर्निग सारखे उपक्रम राबवावेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घ्यावी.

गर्दी होणार नाही यासाठी तंत्रस्नेही व्यक्तींच्या सहकार्याने शोशल मिडीयाच्या माध्यमातून आरतीचा कार्यक्रम ऑनलाईन करण्याचा मानस असल्याचे  उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले यांनी सांगितले. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर, थर्मलगन याचा वापर करून याचा वापर गणेश मंडळांनी करावा. अनावश्यक गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी असे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले. नगर परिषद हद्दीतील गणपती विसर्जननासाठी गतवर्षीप्रमाणे एकत्रीत मुर्ती गोळा करून विसर्जन करणार असून नगर पालिकेच्या वतीने योग्य ते सहकार्य करण्याचे नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे व मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय बिराजदार यांनी गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. तालुक्यात लसीकरणाचा वेग मंदावला असून गणेश मंडळानी लसीकरण करण्यासाठी जनजागृती करावी असे आवाहन केले. 

 गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाड यांनी  ग्रामपंचायतीच्या हद्दीत एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवून गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे सांगितले. प्रस्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले यांनी तर सुत्रसंचालन प्रा. मारोती बुद्रुक पाटील यांनी व आभार पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी मानले. बैठकीच्या यशस्वीतेसाठी अहमदपूर पोलीस उपविभागातील व स्टेशनमधील पोलीस अधिकारी, कर्मचारी व पोलीस बांधवानी परिश्रम घेतले. अहमदपुर पोलिस उपविभागातील किनगाव,जळकोट,वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीतील  गणेश मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटील आदींची उपस्थिती होती.

About The Author