पक्षाचा आणि कार्यकर्त्यांचा मान आणि सन्मान वाढवेन – नागनाथ बोडके
उदगीर (एल.पी. उगिले) : राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष नागनाथ बोडके यांची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की,मी केवळ नामधारी आहे,हे पद प्रत्येक कार्यकर्त्याचे आहे.पक्ष संघटन वाढवून पक्षाची आणि कार्यकर्त्याची प्रतिष्ठा वाढवेन.लोणी येथे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होऊन नागनाथ बोडके यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बोडके यांची निवड झाल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. एका योग्य व्यक्तीचा सन्मान झाल्याबद्दल पक्षश्रेष्ठींच्या आभारही मानले.
याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना नागनाथ बोडके यांनी सांगितले की, मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणूनच उदगीर परिसरात गेल्या सात-आठ वर्षांपासून प्रामाणिकपणे कार्य करत आहे. माझ्या कार्याचा गौरव करून मला हे पद दिले आहे. रा स प चे संस्थापक व माजी मंत्री महादेव जानकर यांच्या अत्यंत निकटवर्ती म्हणून माझी ओळख माझ्या कामामुळे झाली आहे. लातूर जिल्ह्यातील धनगर समाजाचेच नव्हे तर शेतकऱ्यांचे, कष्टकरायचे, मजुरांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक आंदोलने केली आहेत. कोरोना काळात अनेक निराधारांचा, गोरगरिबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडला. पाणी प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा गावामध्ये स्वखर्चाने टॅंकरने पाणीपुरवठा करून लोकांची तहान भागवली. इतकेच नव्हे तर गांधीगिरी करत उदगीर तालुक्यातील खराब रस्ते, रस्त्यावरील खड्डे यासंदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात फुले टाकून खड्याची पूजा करण्याचे आंदोलन असेल नाहीतर उदगीर येथील शेतकऱ्यांसाठी उभारलेले आंदोलन असेल, प्रत्येक ठिकाणी बोडके यांनी मोलाची कामगिरी केल्याचे मत अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले. याप्रसंगी बोडके यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर, पक्षाचे मुख्य सचिव बाळासाहेब दोडतले, जिल्हाध्यक्ष प्रा. विष्णू गोरे, ज्येष्ठ नेते गोविंद नरवटे, लातूर जिल्हा संपर्कप्रमुख रामराव रोडे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे आभार मानले. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मोठं पद दिल्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. याचे भान ठेवून जिल्ह्यात आणि तालुक्यात रासपचे पक्षबांधणी आणि तरुणांना पक्षामध्ये सहभागी करून संघटन वाढीसाठी प्रयत्न करेन, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून सक्रियपणे निवडणुकीमध्ये सहभाग नोंदविन. पक्षाची ताकद दाखवून देईन, माझ्या कोणत्याही कार्यामुळे पक्षश्रेष्ठींना किंवा कार्यकर्त्यांना खाली मान घालावी लागेल असे कोणतेही कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही. असे त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. या सत्कार सोहळ्यासाठी ग्रामीण भागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.