जनसेवेचे व्रत कायम चालू ठेवणार – निवृत्तीराव सांगवे 

जनसेवेचे व्रत कायम चालू ठेवणार - निवृत्तीराव सांगवे 

उदगीर (प्रतिनिधी) : आपण समाजकारणासाठी राजकारणात आलो आहोत. राजकारण हा आपला व्यवसाय नाही, कर्मधर्मसंयोगाने वडिलोपार्जित संपत्ती आपल्याकडे आहे. या संपत्ती पैकी काही हिस्सा सामाजिक बांधिलकी म्हणून आपण समाजातील गोरगरीबावर खर्च करत आहोत. आणि ही समाजसेवा आपण सतत चालू होणार. याचा आणि राजकारणाचा अर्थाअर्थी कोणताही संबंध नाही. असे विचार राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा अखिल भारतीय दलित पँथरचे प्रदेश उपाध्यक्ष, उदगीर नगरपालिकेचे माजी नियोजन व विकास सभापती तथा विद्यमान नगरसेवक निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी व्यक्त केले. ते आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण आपल्या प्रभागातील चंद्रमा नगर, संजय नगर, मुसा नगर, सिद्धार्थ सोसायटी, फुलेनगर, गांधिनगर या परिसरातील अनेक विकास कामे स्वखर्चाने करून देत आहोत. असे स्पष्टीकरण त्यांनी याप्रसंगी केले. आपण समाजाचे काही देणे लागतो, या जाणिवा जपत आपले समाजसेवेचे व्रत चालू आहे. आणि ते कायम चालूच राहील असे आश्वासन त्यांनी दिले. चळवळीतील कार्यकर्त्यांना आधार देणे, गोरगरिबांना मदत करणे ही भावना उपकाराची नसून कर्तव्याचे आहे. असे त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.

 प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे युवा नेते इब्राहिम पटेल यांनी स्पष्ट केले की, निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) हे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या भावनेतून काम करत आहेत. गोरगरिबांच्या मदतीला धावून येणारे नेतृत्व आहे. लॉक डाऊन च्या काळात कित्येक गोरगरिबांच्या घरी अन्नधान्याचे किट देणे, अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय समाजातील गोरगरिबांच्या लग्नकार्यासाठी संसार उपयोगी साहित्य वाटप करणे, आर्थिक मदत करणे. हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे. अशा व्यक्तिमत्त्वावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने सप्ताह भर विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगितले.

 पुढे बोलताना निवृत्ती सांगव (सोनकांबळे) म्हणाले की, माझ्यावर प्रेम करणाऱ्या गोरगरीब जनतेच्या कायम ऋणात राहणार आहे. त्यांची सेवा हाच माझा धर्म आहे. त्यामुळे राजकारण हा विषय बाजूला ठेवून गोरगरिबांनी सतत संपर्कात राहावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुमित वाघमारे यांनी केले.

About The Author